22 April 2019

News Flash

शिवसेनेसमोर वर्चस्व राखण्याचे आव्हान

अमरावतीत १९५२ ते १९८४च्या निवडणुकीपर्यंत सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व होते.

- आनंदराव अडसूळ व नवनीत राणा,

मोहन अटाळकर, अमरावती

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा १९९६ पासून एक अपवाद वगळता कायम शिवसेनेने कायम राखला आहे. यंदा युतीचे अनिश्चित असल्याने शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यासमोर जागा कायम राखण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे, नवनीत कौर-राणा यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असली तरी त्या कोणत्या पक्षातून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ आणि ‘युवा स्वाभिमान’च्या नेत्या नवनीत कौर-राणा यांच्यातच पुन्हा लढत अपेक्षित आहे. गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा या सर्वच पक्षांसोबत संपर्क ठेवून आहेत. कुठल्याही पक्षाच्या स्पष्ट संकेताविना नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मोर्चेबांधणी आरंभली आहे. भाजपच्या वतीने सीमा सावळे यांनी चालवलेली तयारी, वंचित बहुजन आघाडीने गुणवंत देवपारे यांची जाहीर केलेली उमेदवारी, राष्ट्रवादीसाठी दिनेश बुब यांची दावेदारी आणि रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई यांचे ‘एकला चलो’चा सूर यामुळे निवडणुकीआधीच अनेक रंग भरले गेले आहेत.

भाजप आणि शिवसेना युती झाल्यास शिवसेनेचे अडसूळ यांना फार काही आव्हान नसेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या सहापैकी एकाही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आला नव्हता. याउलट भाजपचे तीन आमदार निवडून आले होते.

अमरावतीत १९५२ ते १९८४च्या निवडणुकीपर्यंत सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व होते. विरोधकांच्या एकजुटीतून १९८९च्या निवडणुकीत सर्वप्रथम कम्युनिस्ट पक्षाचे सुदामकाका देशमुख यांनी काँग्रेसच्या तटबंदीला हादरा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा १९९१च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना विजयाची संधी मिळाली, पण त्यानंतर शिवसेनेने हा मतदारसंघ हिसकावून घेतला. गेल्या दोन दशकांमध्ये अनंत गुढे आणि आनंदराव अडसूळ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात या वेळी राजकीय पटलावर दर्शनी बदल दिसत नसले, तरी राजकीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर नवनीत राणा यांनी दुसऱ्या क्रमांकाची ३ लाख २९ हजार २८० मते प्राप्त केली होती. बडनेराचे आमदार रवी राणा हे त्यांचे पती. ते राजकारणात ‘किमयागार’ मानले जातात. युवा स्वाभिमान हा त्यांचा स्वतंत्र पक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळिकीचा दावा ते सातत्याने करतात. पण, स्थानिक पातळीवर पालकमंत्री प्रवीण पोटेंसह सर्व भाजप नेत्यांशी त्यांचे बिनसलेले. दुसरीकडे, नवनीत कौर यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रवादीपासून अंतर राखले. त्या कधीही पक्षाच्या मंचावर दिसल्या नाहीत. राणा यांच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना पक्षातून बाहेर पडावे लागले होते. आता ते स्वगृही परतले आहे. आता त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

खासदार आनंदराव अडसूळ यांना २००९च्या निवडणुकीतही ‘बाहेरचे’ उमेदवार म्हणून काही स्वपक्षीयांचा दुस्वास सहन करावा लागला, त्यात अजूनही बदल झालेला नाही.

रिपब्लिकन पक्षाच्या (गवई गट) राजकारणाचा या मतदारसंघावर आधीपासूनच प्रभाव जाणवतो. पण बावीस वर्षांमध्ये तो शिवसेनेसाठी फायद्याचा ठरल्याचा इतिहास आहे. आता या वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आखाडय़ात प्रवेश केल्याने बरीच समीकरणे बदलली आहेत.

नवनीत राणा या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरणार का, हाच सध्या औत्सुक्याचा विषय बनला आहे. त्यांना राजकीय पक्षाची उमेदवारी नाकारली गेल्यास अपक्ष म्हणून लढत द्यावी लागेल, त्यामुळे समीकरणेही बदलतील. आघाडीत काँग्रेस पक्षाच्या वाटय़ाला हा मतदारसंघ यावा, यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न करून पाहिले, पण त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. अशा स्थितीत स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा राष्ट्रवादीला मिळवावा लागणार आहे. सर्व पक्ष मात्र सध्या सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

रेल्वे सुविधा विकसित करण्यासाठी भरीव प्रयत्न केले. बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. नरखेड रेल्वे मार्ग पूर्णत्वास जाऊन अनेक गाडय़ा धावू लागल्या आहेत. अमरावती रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासोबतच नवीन गाडय़ांना सुरुवात झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी भरीव तरतूद, शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज रूपांतरणासाठी मंजुरी घेतली. बडनेरा रेल्वे स्थानकावर सोयीसुविधांसाठी निधी मिळवला. चांदूर बाजार ते बैतुल रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. रस्ते विकासासाठी ९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. अमरावतीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

– आनंदराव अडसूळ, खासदार, शिवसेना

कोणत्याही प्रकारची भरीव कामगिरी आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकाळात झाली नसल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. त्यांना जिल्ह्यातील गावांची नावे ठाऊक नाहीत. जनसंपर्क नाही. त्यांना मुळात अमरावती जिल्ह्य़ाशी आपुलकीच नाही. केवळ निवडणूक लढण्यासाठी येतात आणि नंतर दिसतही नाहीत. लोकांचे फोन उचलत नाहीत. वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यातच त्यांनी आपला अधिकाधिक वेळ खर्ची घातला आहे. विकासकामे तर शून्यच आहेत. जिल्ह्य़ातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. रोजगाराच्या प्रश्नावर तर कोणतेच ठोस काम झालेले नाही. मेळघाटातील कुपोषण ‘जैसे थे’ आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. लोकांना आता बदल हवा आहे. याची प्रचीती येत्या निवडणुकीत दिसेल.   – नवनीत राणा, नेत्या, युवा स्वाभिमान

First Published on February 12, 2019 1:11 am

Web Title: analysis of amravati lok sabha constituency