News Flash

सहकारी मंत्र्यांच्या आदेशाबाबत गीते अनभिज्ञ

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मात्र या योजनेला विरोध दर्शवला.

अवजड उद्योगमंत्री अनंत गीते

कोयना अवजलाचा वापर मुंबईसाठी करण्याच्या दृष्टीने केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास दिलेल्या आदेशाबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे सोमवारी उघड झाले.
जिल्ह्य़ात राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना गीते म्हणाले की, कोयनेचे अवजल मुंबईला नेण्याचा कोणताही प्रस्तावच नाही.

जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात या मुद्दय़ावरून थोडी मतभिन्नता असली तरी कोणत्याही स्वरूपाचा वाद नाही. तसेच या संदर्भात कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गेल्या महिन्यात चिपळूणमध्ये आयोजित कृषी मेळाव्यात बोलताना या विषयाला प्रथम तोंड फोडले.
स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांनी कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याच्या प्रस्तावाबाबत त्या कार्यक्रमामध्ये नापसंती व्यक्त केली होती. त्यावर टिप्पणी करताना वायकर यांनी, आक्रमक भूमिका घेत चिपळूण तालुक्यातील गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उरलेले पाणी मुंबईला वळवण्यात येईल, असे स्पष्टपणे जाहीर केले.

त्यापाठोपाठ राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मात्र या योजनेला विरोध दर्शवला. दरम्यान भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांच्याशी संपर्क साधला होता. त्याआधारे, उमा भारती यांनी कोयना अवजलाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचा आदेश दिला असल्याचे शेलार यांनी गेल्या १५ सप्टेंबर रोजी मुंबईत जाहीर केले. त्यावरून वायकर यांनी शेलार यांच्यावर श्रेयवादाचाही आरोप केला होता. मुंबई महापालिकेत असल्यापासून आपण हा विषय लावून धरल्याचे वायकर यांचे म्हणणे होते, तर मी उमा भारती यांच्याशी संपर्क साधून या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केल्यामुळेच त्यांनी डीपीआर तयार करण्याचे आदेश दिल्याचा दावा शेलार यांनी केला होता. याबाबतच्या बातम्या मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या. पण केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले गीते त्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, हे त्यांच्या आजच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. तसेच त्यांनी या विषयावर तपशीलवार भाष्य करण्याचेही टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 2:34 am

Web Title: anant geete completely unaware of water resources minister uma bharati order on mumbai water
टॅग : Anant Geete
Next Stories
1 तूरडाळ दरात घसरण..
2 मराठवाडय़ाला पाणी देण्यास नाशिक, नगरमधून विरोध
3 मोकाट ‘ऑनलाईन’ लुटारूंपैकी एकाला झारखंडमध्ये अटक
Just Now!
X