मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती. अखेर आज अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर, भाजपा नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषद घेत प्रतिक्रिया दिली तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदारा टीका केली.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नारायण राणे म्हणाले, “अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना आणि सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करून द्यायला सांगितले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. पोलीस आयुक्त उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा, असं सांगितल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खळबळ माजली, भयभीत वातावरण तयार झालं. अनिल देशमुख यांनी आयुक्त आरोप करतात तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगायला हवं होतं. पण तो दिला गेला नाही, अखेर उच्च न्यायालयाला सांगावं लागलं की सीबीआयने चौकशी करावी आणि सीबीआयचं नाव येताच, त्यांना वाटलं की मी सीबीआय समोर गेलो तर वस्तूस्थिती सांगावी लागेल. या भीतीपोटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.”

मोठी बातमी! अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

तसेच, “मला यावर असं म्हणायचं आहे की, केवळ अनिल देशमुखच नाही पण यामध्ये आता लवकरच एनआयएकडून व सीबीआयकडून अहवाल येईल व आपलं पण नाव येईल म्हणून अनेकजण भयभीत झालेले आहेत. काहीजण प्रतिक्रिया देखील देत नाहीत. मुख्य जबाबदार व्यक्ती असताना, सचिन वाझेला ज्यांनी पोलीस खात्यात घेतलं. गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती केली. अनेक महत्वाच्या केसेस देखील दिल्या, अशी व्यक्ती म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत का? सर्वच नेते बोलत आहेत, मग हे का गप्प आहेत? त्यांचा सहभाग आहे की काय? घाबरले आहेत की काय? सचिन वाझे, परमबीर सिंह हे पोलीस खात्यातीलच माणसं आहेत मग ते वास्तवादी चित्रं बाहेर आणत असताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं ते राज्याचे प्रमुख आहेत. पण ते बोलत नाहीत. याचाच अर्थ मी समजतो, त्यांचा कुठंतरी सहभाग आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय बदल्यांमध्ये पैसे, करदात्या दुकानदारांकडून पैसे उकळण्यासाठी आणि महिन्याला १०० कोटींच टार्गेट हे शक्य नाही आणि म्हणूनच मला वाटतं हा राजीनामा अगोदरच द्यायला हवा होता उशीरा झाला. शेवटी सीबीआयला घाबरून हा राजीनामा दिलेला आहे, असं माझं मत आहे. ” असं देखील नारायण राणेंनी सांगितलं.

अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

याशिवाय, “या सगळ्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी सचिन वाझेला अटक करायला अनेक वेळा व्यत्यय आणला. त्याच सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी काम दिलं होतं. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का? जे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं, त्यावर देखील काही उत्तर दिलं गेलं नाही. याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आज कुठं चाललं आहे? आतापर्यंत मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कुठल्याही मंत्र्याची चौकशी केल्यास त्याला राजीनामाच द्यावा लागेल, अशी प्रकरणं आहेत. ज्यांच्या नेतृत्वात राज्य सुरू आहे, त्यांना काहीतरी थोडं वाटायला हवं. आपण भ्रष्टाचार करून पैसे कमावायला आलो आहोत की जनतेला न्याय द्यायला आलो आहोत? याचा विचार करायला हवा.”