पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धुळ्यात झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि जाहीर सभा म्हणजे निव्वळ फेकाफेकी आणि जनतेची शुद्ध फसवणूक होती. जनतेला मूर्ख बनवायचे होते, तर शहीद जवानांच्या चितेचे निखारे तरी शांत होण्याचा धीर धरला असता, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

शनिवारी मोदींच्या हस्ते धुळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. तसेच जाहीर सभाही झाली. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह भाजपाच्या इतर नेत्यांनी धुळ्यात कार्यक्रम घेतल्याबद्दल गोटे यांनी संताप व्यक्त केला. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग भूमिपूजनाचा कार्यम म्हणजे शुद्ध फसवणूक आणि फेकाफेकी होती, अशी टीकाही त्यांनी केली.  रेल्वेमार्गाचा ११२ वर्ष जूना प्रश्न आपल्या कालखंडात मार्गी लावण्याचे श्रेय पदरात पाडून घेण्याकरीता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी एका खोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले. रेल्वे मार्गाला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, तांत्रिक मान्यताही नाही. अर्थसंकल्पात अत्यल्प तरतूद करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत याचे उत्तर द्यावे लागेल, असे गोटे यांनी म्हटले आहे.

पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना १२ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या पत्रात मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग किंवा धुळे ते नरडाणा या रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनचा उल्लेख नव्हता, याकडे गोटे यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान येणार म्हणून शेतकरी डोळे लावून बसले होते. कांदा उत्पादक, कापूस उत्पादक त्यांना ऐकण्यासाठी आले होते. पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी अवाक्षर काढले नाही, अशी टीका गोटे यांनी केली.