केंद्रीय मंत्री अनिल दवे यांचे संघ विरोधकांना आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सातत्याने ‘लक्ष्य’ करणाऱ्या संघ विरोधकांनी संघाचा इतिहास लक्षात घेण्याची ‘दक्ष’ता घेतली, तर स्वातंत्र्य लढय़ात संघ परिवाराचे असलेले योगदान त्यांना समजेल. ब्रिटिशांविरोधात रा.स्व.संघाचे संस्थापक  डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आपल्या ५१ वषार्ंच्या  आयुष्यात देशकार्यात आणि स्वातंत्र्य लढय़ात दिलेल्या योगदानाचा इतिहास संघ विरोधकांनी अभ्यासला पाहिजे असे आवाहन केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी येथे केले.

स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी २१ जुल १९३० ला यवतमाळ जिल्ह्य़ातील धामणगाव मार्गावरील करळगावच्या घनदाट जंगलात जाऊन सत्याग्रह केला होता, त्यामुळे त्यांना ९ महिने कारावसाची शिक्षा झाली होती. अकोल्याच्या कारागृहात डॉक्टरांनी ही शिक्षा भोगली. वारंवार टीका व आरोप करणाऱ्यांना उत्तर देणे आवश्यक असते म्हणून संघाचा इतिहास अभ्यासा, असे आपले संघविरोधकांना आवाहन असल्याचे दवे यांनी स्पष्ट केले.

डॉ. हेडगेवार यांनी जेथे जंगल सत्याग्रह केला त्या करळगाव घाटात डॉ. हेडगेवार स्मृती केंद्र उभारण्यासाठी खासदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा अनिल दवे यांनी यावेळी केली. असे केंद्र व्हावे, ही मागणी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी केली होती.