जनतेचा विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत, असे मी म्हटले होते. त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले; परंतु एक वर्षांत लोकायुक्तांची नेमणूक होऊ शकली नाही. त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले आहेत, असा उद्वेग ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केला.
लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज सहावा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले, ‘‘लोकपाल आंदोलनामुळे केंद्र तसेच राज्य सरकारला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. ज्या जनतेच्या आंदोलनामुळे तुम्हाला सत्ता मिळाली त्यांच्याशीच तुम्ही गद्दारी करायला लागले आहात का? जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवायचे सोडून त्यांच्याविरोधात वागत आहात.’’
‘‘भाजपचे नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज सत्तेवर येण्यापूर्वी लोकसभेत काय बोलत होते, हे जनता विसरली नाही. सत्तेवर आल्यावर मात्र ते गप्प बसले आहेत, काहीच बोलायला तयार नाहीत. ज्या लोकपाल- लोकायुक्त आंदोलनामुळे सत्ता मिळाली, त्या लोकपालांचीच त्यांना अॅलर्जी झाली आहे. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसने डॉक्टरेट केली आहे, तर भाजपने ‘ग्रॅज्युएशन’ केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे’’, असा आरोपही हजारे यांनी केला.
अण्णांच्या मागण्या मान्य केल्याचे सरकार सांगत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर हजारे म्हणाले, ‘‘मागण्या मान्य केल्या असे सांगणे ही जनतेची दिशाभूल आहे. मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषण सुरू ठेवले असते?’’
केजरीवाल यांना अण्णांमुळे ओळख मिळाली, त्यांनी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी यायला हवे होते, या राज ठाकरे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, ज्याची-त्याची इच्छा असते, कोणावर दबाव टाकणे योग्य नाही, असे हजारे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीस भेट देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ठोस प्रस्ताव असेल तरच या, केवळ चर्चा करण्यात अर्थ नाही, असे आपण त्यांना कळवल्याचेही हजारे म्हणाले.
प्रकृती खालावली
उपोषणाच्या सहाव्या दिवशी हजारे यांचे वजन ४ किलो २०० ग्रॅमने घटले आहे. रक्तातील साखर कमी झाली असून रक्तदाबही कमी-अधिक होत आहे. लघवीतही किटोन आढळले आहे. त्यांना थकवाही मोठय़ा प्रमाणात जाणवत असल्याचे डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले.