अण्णा हजारे यांचा इशारा

लोकपाल विधेयक जे आम्ही आणले, ते सरकारने आहे तसे स्वीकारावे, अन्यथा २०११ मध्ये दिल्लीत केलेल्या आंदोलनाप्रमाणेच याही सरकारच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडू, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. मोदी सरकारने हे विधेयक कमजोर केल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली. भाजप सरकार हे ना शेतकऱ्यांचे, ना सर्वसामान्यांचे, हे तर केवळ उद्योगपतींचे आणि धनदांडग्यांचे असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.

जनसंसद संघटनेतर्फे कोरेगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. हजारे म्हणाले, की दिल्लीच्या संसदेपेक्षा आम्हाला लोकसंसद महत्त्वाची असून ही संसद जागी झाली पाहिजे. गाव, समाज, राष्ट्रहितासाठी आपली धडपड आहे, परंतु माझ्या नावाचा उपयोग करून घेऊन काही लोक सत्ता मिळवीत आहेत. यातील एक जण दिल्लीचा मुख्यमंत्री झाला, असा अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळत हजारे यांनी केजरीवालांवर नाराजी व्यक्त केली. आता अशा कार्यकर्त्यांपासून मी सावध आहे. मी आता कार्यकर्त्यांना ‘बाँड’ करूनच माझ्याबरोबर काम करण्यासाठी घेतो. आतापर्यंत चार हजार कार्यकर्त्यांनी मला असे करार  करून दिले आहेत. असे दोन लाख कार्यकर्ते तयार करण्याचे लक्ष्य असून, या बळावर पंतप्रधानांचे नाक दाबले की तोंड उघडेल अशी परिस्थिती निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याने केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले, पण त्यांनी हे विधेयक कमजोर केल्याने भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचे फावले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करण्याची आमची मागणी होती, परंतु सरकारने हा मुद्दाच विधेयकातून काढून टाकल्याने अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे. एकीकडे मोदी ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ अशी घोषणा करीत असले तरी त्यांचा एकंदर कारभार पाहता देश भ्रष्टाचारमुक्त होणार कसा, असा सवाल त्यांनी केला.

२७ जुलै २०१६ रोजी लोकपाल विधेयक लोकसभेत आणले. २८ जुलैला हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले, तर २९ जुलैला या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. फक्त तीन दिवसांमध्ये हे विधेयक मंजूर झाले, परंतु आम्ही जे लोकपाल विधेयक सरकारकडे मंजुरीसाठी दिले होते, त्यातील अनेक मुद्दे वगळल्याने हे लोकपाल विधेयक कमजोर झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकार आता जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकत आहे, त्यामुळे तुम्हाला जागे करण्यासाठी आपण आलो आहोत. कोणत्याही सरकारशी देणेघेणे नसल्याने आजवर आपण अनेक शासनांच्या चुकीच्या कारभाराविरोधात आंदोलने छेडली. आताची लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची आहे. तरी त्यात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन हजारे यांनी केले.