ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ झाल्याचं सांगताना आपण अद्याप उपोषणावर ठाम असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ठोस पावलं उचलणार असाल तरच या अशा शब्दांत चर्चा करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना सुनावलं आहे. नुसती आश्वासनं द्यायची आणि वेळकाढूपण करायचा याला काही अर्थ नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होती.

नेते चर्चेला आल्यावर नकार देता येत नाही. नुसत्या चर्चेने प्रश्न सुटत नाहीत. नेत्यांच्या भेटी म्हणजे लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे असा टोला अण्णांनी यावेळी लगावला. पुढे बोलताना त्यांनी सरकारचे आणि आमचे लोक ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे अशा प्रत्येकी तीन-तीन लोकांनी चर्चा करावी. त्यात जर एकमत झालं तर विचार करु. पण एकमत झालं नाही तर उपोषण सुटणार नाही असं सांगितलं.

शेतकऱ्यांच्या मुद्यावर एक एक विषय घेऊन चर्चा केली गेली पाहिजे अशी मागणी यावेळी अण्णांनी केली. सरकारने निर्णय घेतल्याचा पुरावा द्याला हवा असं सांगताना आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे पाहतात पण आंधळे झाले आहेत अशी खंत व्यक्त केली. तसंच चर्चेसाठी पीएमओच्या जबाबदार आणि योग्य व्यक्तीने यावं असंही ते म्हणाले आहेत.