समाजात परिवर्तन हे शब्दांनी, भाषणांनी होणार नाही, तर दु:खी,पीडितांच्या प्रत्यक्ष सेवेतूनच होईल. ‘महामानव बाबा आमटे सेवा संस्थे’चे काम असेच परिवर्तन घडवणारे आहे. युवाशक्ती ही देशाची खरी शक्ती आहे, ती जागी झाली तर देशात निश्चितच परिवर्तन होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.

स्नेहालय परिवारातील ‘महामानव बाबा आमटे सेवा संस्थे’च्या घुगलवडगाव (ता. श्रीगोंदे, जि. नगर) येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्रातील ‘जानकीदेवी बजाज बालिका वसतिगृहा’चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सायंकाळी ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्या वेळी हजारे बोलत होते.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

‘लोकसत्ता’ दरवर्षी गणेशोत्सवात राबवत असलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून मिळालेली मदत, तसेच मुंबईतील आनंदवन मित्रमंडळ आणि बजाज फायनान्स कंपनीच्या सहकार्यातून हे बालिका वसतिगृह उभारण्यात आले आहे.

आनंदवन मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री, बजाज उद्योग समूहाचे सी. पी. त्रिपाठी, बजाज फिनसर्व कंपनीचे अजय साठे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, विद्यार्थी सहायक समितीचे (पुणे) रमाकांत तांबोळी, बेळगावच्या स्नेहस्पर्श संस्थेचे महेतांश पाटील, स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी आणि राजीव गुजर, घुगलवडगावच्या सरपंच मंगला दांगडे, तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने युवा प्रेरणा शिबिराचा समारोपही करण्यात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे कार्यक्रमातील सत्कारांना फाटा देण्यात आला. वसतिगृह उभारणीस सहकार्य करणाऱ्यांचा या वेळी संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता पत्र’ देऊन गौरव करण्यात आला.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘समाजाची दिशा’ या विषयावर  विचार मांडताना सांगितले, की देशाच्या प्रगतीसाठी सक्षम व्यवस्थेची उभारणी गरजेची असते, तीच आपल्या देशात झाली नाही.  युरोपमध्ये व्यवस्था निर्माण होण्याची क्रांती १३-१४ व्या शतकात घडली. त्यातून सुसंस्कृतपणा लोकांमध्ये उतरला. भारतातही शिक्षणातून व्यवस्था बदलाचा रेटा निर्माण व्हायला हवा.

महामानव बाबा आमटे सेवा संस्थेचे कार्य अशा बदलासाठी प्रेरणा देते. भौतिक सुविधा, बाजारपेठांचे दडपण यांना बळी न पडता अशा संस्था, हजारे यांच्यासारखे समाजधुरीण उभे राहतात, हे कौतुकास्पद आहे. नगर जिल्ह्य़ात लोक शिर्डीसारख्या देवस्थानला येतात, मात्र त्यांना अशा संस्था, हजारे, हिवरेबाजार यांची माहिती नसते, असे सध्याचे वातावरण अंगावर येणारे, अमानवी आविष्काराचे आहे. अशा वेळी सेवाभावी संस्था मनाला उभारी देण्याचे काम करतात, त्याला पाठबळ देण्याचे काम ‘लोकसत्ता’ करत आहे, असेही कुबेर म्हणाले.

दिवंगत बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नरेंद्र मेस्त्री, सी. पी. त्रिपाठी, जयंत मीना आदींची भाषणे झाली. संस्थेचे संघटक अनंत झेंडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. सचिव अनिस गावडे यांनी भावी उपक्रमांची माहिती दिली. अजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रोडे यांनी आभार मानले. या वेळी संस्थेच्या ‘मुंगी उडाली आकाशी’ आणि ‘ये हाल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेतून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.