ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा अनेक राजकीय नेत्यांना फायदा झाला. त्यामुळे आता त्यांनी नेत्यांपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र आज हजारे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांना शुभेच्छा तर दिल्याच पण पाठीवर हात ठेवून आशीर्वादही दिले.

गडाख यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राळेगणसिद्धी येथे हजारे व आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच पोपट पवार यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासमवेत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे होते. या वेळी अण्णा हजारे यांनी त्यांचे सध्या मौन आंदोलन सुरु असल्याने पानभर मजकूर असलेल्या पत्राद्वारे गडाखांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या पत्रात म्हटले आहे, की मी कुठल्याच पुढाऱ्याच्या पाठीवर कधीच हात ठेवत नाही. परंतु मंत्री शंकरराव गडाख आणि युवा नेते प्रशांत गडाख या दोघा बंधूंच्या पाठीवर हात ठेवत आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी समाज सेवेची परंपरा जोपासली आहे. त्याला मंत्रीपदाचे फळ लाभले आहे. ईश्वराने आपल्याला दिलेला मनुष्य जन्म फक्त सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर निष्काम भावनेने समाजाची सेवा करण्यासाठी दिला आहे, हे यशवंतराव यांनी आपल्या जीवनात दाखवून दिले आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग हे गुण जीवनात असावे लागतात. काही वेळेला हे गुण असूनसुद्धा काही लोक विरोध करतात, निंदा करतात, अपमानित करतात. त्यासाठी अपमान पचवण्याची शक्तीही असावी लागते. हे यशवंतराव यांच्या जीवनात पाहायला मिळते. अशा यशवंतराव यांच्या संस्कारात आपण लहानाचे मोठे झालात. त्यामुळेच यशवंतराव यांचे गुण आपल्या जीवनात पाहायला मिळतात, असे या पत्रात हजारे यांनी नमूद केले आहे.

यात पुढे म्हटले आहे,की सत्तेच्या आधाराने जनतेसाठी विकासकामे करणे आवश्यकच आहे. पण हे ज्या माणसांसाठी करायचे ती माणसे विकासापासून दूर जात असतील तर त्या कर्माला अर्थ राहात नाही. आपण हे जाणता, त्यामुळे ही कामे करतानाच माणसेही जोडत आहात, अशा शब्दात  हजारे यांनी गडाख बंधूंचे कौतुक केले. हजारे यांनी गडाख बंधूंच्या खांद्यावर हात ठेवत शुभेच्छा दिल्या. मी कुठल्याच पुढाऱ्याच्या पाठीवर हात ठेवत नाही. परंतु तुमच्या पाठीवर हात ठेवत आहे असेही हजारे यांनी उपस्थितांसमोर लिहून दिले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या केंद्राच्या अखत्यारीत येत असल्या तरी महिलांवर अन्याय केलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठपुरावा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे गडाख यांनी या वेळी सांगितले .