जय हरी विठ्ठल! विठुमाऊली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पंढरपुरातल्या विठोबाची मूर्ती. मात्र याच पंढरपुरात एक नाही दोन विठ्ठल असणार आहेत. कारण बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. १५ जानेवारी २०१४ पासून खंडीत झालेली उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठल मंदिर उभारण्यात आले आहे. बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे बडवे समाजाची बंडखोरीच एक प्रकारे समोर आली आहे.

विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे समाजाने वेगळे विठ्ठल मंदिर उभारले आहे. विठ्ठल मंदिरात भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनाने विठ्ठल आणि रूक्मिणी मंदिर ताब्यात घेतले. बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क आणि अधिकार या निर्णयामुळे संपुष्टात आले. शासनाने मंदिर ताब्यात घेऊन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींनी २७ वर्षे लढा दिला होता. १५ जानेवारी २०१४ रोजी सुप्रीम कोर्टाने बडवे-उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे हक्क मोडीत काढून मंदिर शासनाच्या ताब्यात दिले. यानंतर या ठिकाणी पगारी पूजारी नेमण्यात आले. त्यामुळे काही दिवसांनी उत्पातांनी स्वतंत्र रूक्मिणी मंदिर उभारले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आता बडव्यांनीही विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंढरपुरात आता दोन विठ्ठल मंदिरं झाल्याने भाविकांनी, वारकऱ्यांनी आणि तमाम भक्तांनी कोणत्या विठ्ठलाकडे गाऱ्हाणं मांडायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. बडव्यांनी उभारलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्यात आली. हे मंदिर माझ्या जागेत बांधले असून कुलधर्म, कुळाचार करण्यास तसेच माझ्या आई–वडिलांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधल्याचे बाबासाहेब बडवे यांनी सांगितले.