राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादण्यास सुरूवात करण्यात आली आहे. काही शहरांमध्ये लॉकडाउन व संचारबंदीची घोषणा देखील केली गेली आहे. याशिवाय, राज्यभरातील नागरिकांना देखील नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल(रविवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना, राज्यात धार्मिक, सामाजित व राजकीय आंदोलन, मोर्चे, सभा आदींवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना महाविकासआघाडी सरकारला सवाल केला आहे.

“महाराष्ट्रात आज सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता आहे. शेतकरी त्रस्त आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोनाने पुन्हा डोक वर काढलं आहे. जनतेतील हा असंतोष अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येईल, या भीतीने लॉकडाऊन,निर्बंध लादले जातायत का? असा प्रश्न पडतो.” असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“राज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी”

सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुखपट्टी वापरा, शिस्त पाळा आणि टाळेबंदी टाळा ही त्रिसूत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.