अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. अर्णब गोस्वामी यांना कारागृहात ठेवण्यात आलं असून, याच प्रकरणावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला आहे.
किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट केली आहेत. “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार •गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे नव ठिकाणी दिसत आहेत. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis pic.twitter.com/w5PzrNQI96
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 11, 2020 3:41 pm