जलसंधारण, वृक्षारोपण व दूध प्रकल्पाच्या माध्यमातून गावाचा कायापालट

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शासकीय योजनेला किंवा निधीला लोकसहभागाची जोड मिळाल्यास छोटय़ाशा गावालाही विकासाचा मार्ग सापडू शकतो, याचा प्रत्यय वाशीम जिल्ह्य़ातील भामदेवी या गावात आला आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसोबतच ग्रामस्थांनी एकजुटीने घेतलेल्या परिश्रमामुळे अवघ्या एक ते दीड वर्षांत जलसंधारण, वृक्षारोपण व दूध प्रकल्पाच्या माध्यमातून गावाचा कायापालट झाला. त्यामुळे या गावातील विविध कार्याची अनेकांना भुरळ पडली आहे.

विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्य़ांतील गावांचा आदर्श विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभियान राबविले. निवड झालेल्या गावांना पहिल्या टप्प्यात एक कोटीचे अनुदान देण्यात आले. यासाठी वाशीम जिल्ह्य़ातील भामदेवी या गावाची निवड झाली. राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील वाशीम जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असताना विकास कार्यासाठी भामदेवीला निवडण्यात आले. वाशीम जिल्ह्य़ातील कारंजा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त होते. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या तालुक्यातील दहा गावांमधून भामदेवी गावाचा समावेश होता. विकासकामासाठी ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रशासनाने या गावाला प्राधान्य दिले. भामदेवी हे सुमारे ४५० कुटुंब संख्या असलेले गाव असून, शेती आणि शेतमजुरी हेच येथील ग्रामस्थांचे प्रमुख व्यवसाय आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जिल्’ााला मिळालेल्या निधीतून विकासकामे राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या एक ते दीड वर्षांत या ठिकाणी झालेल्या विविध विकासकामांमुळे भामदेवीतील शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनमानात कमालीचा बदल झाल्याचे दिसून येते. ग्रामस्थांची मानसिकता बदलली असून गावात नवनवीन उप्रकम राबविण्यावर विशेष भर दिला जात आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून विविध विकासकामे राबविण्यासाठी भामदेवी गावाची निवड झाल्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गावामध्ये जाऊन ग्रामस्थांची बठक घेतली. गावाची गरज व समस्या जाणून घेतल्या. पाण्याची कमतरता जाणवत असल्याने जलसंधारणाच्या कामाची आवश्यकता होती. इतर विकास कामांविषयीसुद्धा ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली.

विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात एक कोटीचा निधी प्राप्त झाला. गावातील साडेसहा हेक्टर शासकीय जमिनीवर खोल सलग समतल चर (डीप सीसीटी)चे काम करण्यात आले. या जलसंधारणाच्या कामामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. याच दरम्यान राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात झाली. प्रत्येकाने आपल्या झाडाचे संवर्धन करण्याचे व प्रत्येकवर्षी किमान एक तरी झाड लावण्याचा निर्धार केला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी या कामाला भेट देऊन ग्रामस्थांच्या कार्याची विशेष दाखल घेतली. बरोबर वर्षांने ग्रामस्थांनी सर्व वृक्षांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा केला.

शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने त्याला जोडधंदा म्हणून गावात दुग्ध व्यवसाय सुरू करून प्रकल्प उभारण्यात आला आहे. ५६ लाभार्थ्यांना १७२ म्हशींचे अनुदानावर वाटप करण्यात आले. दुधाला चांगला मोबदला मिळण्यासाठी भामदेवी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून एक हजार लिटर क्षमतेचे दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले. जुल २०१७ मध्ये संस्थेने स्वतचा ‘वऱ्हाड दूध’ हा ब्रँड तयार केला. तसेच त्याला भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाणन प्राधिकरण अर्थात ‘एफएसएसएआय’  परवाना प्राप्त करून घेतला. ‘वऱ्हाड दूध’ नावाने प्रक्रिया केलेल्या दुधाची पॅकिंग करून कारंजा लाड येथे विक्री केंद्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना शेडनेट, शेततळे यांचा लाभ देऊन त्यांना कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. गावाला मिळालेला मुख्यमंत्री साहाय्यता निधी व त्याचा लोकसहभागातून झालेला योग्य वापर यामुळे गावात परिवर्तन घडून आले. गावातील शेतीवर अवलंबून असलेले अर्थकारण बदलले असून जोडधंदा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची आíथक उन्नती झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

गावात झालेल्या विकासकामांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने घेतली आहे. गावातील विकासकामांविषयी संजय डव्हक व मनोहर तेलंगे या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल व फेसबूक पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून गावातील विकासकामांबद्दल अशा प्रकारे कौतुक झाल्याने ग्रामस्थांचा, प्रशासनाचा उत्साह वाढला आहे.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून विकासकार्य करण्यासाठी कारंजा तालुक्यातील भामदेवी गावाची निवड झाली.  ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे अवघ्या दीड वर्षांत गावात विविध कार्ये राबविण्यात आली आहेत. आता विकासकामांसाठी गावाने नावलौकिक प्राप्त केला आहे.  – राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशीम

मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून गावात होत असलेल्या विकासकामांमुळे गावाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. गावकरी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहेत. भामदेवी येथे झालेल्या विकासकामांविषयी मुख्यमंत्री कार्यालयानेही दाखल घेतली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.   – सुभाष मोहकर, सरपंच, भामदेवी