देशातील संपूर्ण माध्यमे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी विकली गेली आहेत आणि मोदींच्या प्रचारासाठी माध्यमांना मोठी रक्कम मिळाली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आम आदमी पक्ष आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांना पत्रकारांनी या आरोपांबाबत विचारले असता, त्यांनी याचा इन्कार केला. मी कशाला माध्यमांवर आरोप करेन, असा प्रतिप्रश्नच केजरीवाल यांनी उपस्थित केला.
केजरीवाल नागपूरमधील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, गेल्या एक वर्षापासून आपल्याला सातत्याने मोदी आज इथे आहेत, मोदी आज तिथे आहेत, असे वारंवार सांगितले जाते आहे. काही वृत्तवाहिन्यातर देशात रामराज्य येणार असल्याचे सांगून भ्रष्टाचार मिटणार असल्याचा दावा करताहेत. ही सगळी माध्यमे असे का करताहेत? कारण वृत्तवाहिन्यांना त्यासाठी पैसे देण्यात आले आहेत. मोदी यांच्या प्रसिद्धीसाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे.
केजरीवाल पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थितांसमोर असे बोलत असल्याचा व्हिडिओच काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला आहे.
गेल्या दहा वर्षांत गुजरातमध्ये १००० शेतकऱयांनी आत्महत्या केली. मात्र, कोणतीही वृत्तवाहिनी याबाबत काहीही दाखवायला तयार नाही. काही शेतकऱयांनी तर आपल्या जमिनी अवघ्या एका रुपयात कंपन्यांच्या हवाली केल्या आहेत. पण कोणीही यावर बोलायला तयार नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला.