शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात रविवारी पुन्हा एकदा भर पडली. भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, भाजपा-मनसे एकाबाजूला असे चित्र आहे. भाजपा आणि मनसेमध्ये अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांनी धरलेली हिंदुत्वाची कास आणि मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यातून राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपाच्या मैत्रीकडे झुकत असल्याच्या चर्चा आहेत.
२०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय मोट बांधण्यासाठी आणि शिवसेनेला मुंबईत धक्का देण्यासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपा नेते आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चा वाढू लागलेल्या दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेलार यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली ही दुसरी भेट आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अंबरीश मिश्र हे राज ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. त्यापूर्वीच भाजपा नेत्याची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 1, 2020 1:49 pm