अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

नांदेड : ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ साजरा करत असताना आज मराठवाडय़ावरील अन्यायाला मुक्ती मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्वानाच प्रयत्न करावे लागणार असून गरज पडली तर हाती मशाल घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असे सांगतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही संतांची भूमी असली तरी तिला ‘संथां’ची भूमी होऊ न देण्याचे आवाहन जनतेला केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत मंगळवारी येथील कुसुम सभागृहात हैदराबाद मुक्ती लढय़ात सहभागी वीरांचा आणि त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘हैदराबाद मुक्तीचे राष्ट्रीय महत्त्व’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री चव्हाण हे होते तर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, स्वातंत्र्यसैनिक शिवानंद राहेगावकर, नारायणराव भोगावकर, कुसुमताई लहानकर, संजीव कुळकर्णी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोपात चव्हाण यांनी मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट समाविष्ट झाला आहे. मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे; पण ही माहिती आता पुस्तकाद्वारे देऊन चालणार नसून ती गुगल, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमातून द्यावी लागणार असून आताच्या व्यक्तींची चव बदलली असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात मराठवाडय़ाला न्याय मिळाला पाहिजे. एकसंध महाराष्ट्र ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठवाडय़ाचा आणि मराठवाडय़ासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहूनच मराठवाडय़ाचा विकास करून घेण्यासाठी येण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. आज सर्वच क्षेत्रात परिस्थिती बिकट झाली आहे, पण या बिकट परिस्थितीतही मराठवाडय़ातील माणूस संथच दिसत आहे. तो अन्याय का सहन करीत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  मराठवाडय़ाचा पाण्याचा प्रश्नही जैसे थे आहे. इसापूर प्रकल्पाचे पाणीही पळविले जात आहे. त्यामुळे आता हाती मशाल घेऊन रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मधुकर भावे यांचेही भाषण झाले.

‘हैदराबाद मुक्तीचे राष्ट्रीय महत्त्व’ या विषयावर बोलताना हा लढा भारतीय स्वातंत्र्यपेक्षाही अत्यंत कठीण असा होता असे प्रा. शेषराव मोरे यांनी सांगितले. इंग्रजांनी भारतात अनेक सुधारणा केल्या. भारताला लोकशाही दिली, या उलट निझामाचे सरकार हे जुलमी होते. सन्यांच्या ताकदीवर ते टिकून होते. अखंड भारत ही संकल्पना भारताला गुलामगिरीकडे नेणारी होती, असेही ते म्हणाले. त्याचवेळी देशाची झालेली फाळणीही भारतासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.

या वेळी हैदराबाद मुक्ती लढय़ातील सहभागी वीरांचा आणि त्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.