11 December 2017

News Flash

नांदेडमधील विजयातून अशोक चव्हाणांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर

चव्हाणांसाठी वैयक्तिकदृष्या ही बाब फारच महत्त्वाची म्हणावी लागेल.

मुंबई | Updated: October 12, 2017 2:42 PM

Nanded waghala mahanagarpalika Election 2017 : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत यश मिळवून चव्हाणांनी राणेंना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच नांदेडमधील आपल्या राजकीय वर्चस्वाचा वचक दाखवून दिला आहे.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकावून अशोक चव्हाण यांनी भाजपची राज्यातील घोडदौड रोखण्याबरोबरच स्वत:चा राजकीय करिष्मा सिद्ध केला आहे. काही दिवसांपूर्वी नारायणे राणे यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर टीकेची तोफ डागली होती. राज्यातून काँग्रेस संपवण्यासाठी अशोक चव्हाणांचे नेतृत्त्व हातभार लावत असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यामुळे साहजिकच चव्हाणांच्या नेतृत्त्वाविषयी कुजबूज सुरू झाली होती. मात्र, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत यश मिळवून चव्हाणांनी राणेंना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच नांदेडमधील आपल्या राजकीय वचक दाखवून दिला आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना चव्हाण यांच्या काहीशा अपवादात्मक राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला.

आदर्श घोटाळा उघडकीला आल्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून त्यांच्या डोक्यावर सतत चौकशीची टांगती तलवार आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध अक्षरश: रान उठवले. मात्र, तरीही लोकसभा ते आताची महानगरपालिका निवडणूक प्रत्येक टप्प्यावर चव्हाणांनी जिल्ह्यातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता चव्हाणांसाठी वैयक्तिकदृष्या ही बाब फारच महत्त्वाची म्हणावी लागेल.

नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’, भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम

काँग्रेसच्या बॅ. ए. आर. अंतुले आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना चव्हाणांप्रमाणेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत त्यांचे निर्दोषत्वही सिद्ध झाले. परंतु, राजकीयदृष्या पुन्हा उभे राहण्यास त्यांना खूपच वेळ लागला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे पक्ष संघटनेतील वजन फारसे कमी झाले नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत ते राजकारणात कायमच सक्रिय होते. लोकसभा निवडणुकीवेळी मोदीलाटेत राज्यभरात काँग्रेसचे पानिपत झाले असताना नांदेड आणि हिंगोली या दोनच मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. त्यानंतर विधानपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली यश मिळवले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा महानगरपालिकेत निर्विवाद यश मिळाल्याने चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

First Published on October 12, 2017 2:42 pm

Web Title: ashok chavan nanded waghala mahanagarpalika election 2017 narayan rane congress bjp