प्रचार बैठकीत खासदार अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

नांदेड-वाघाळा शहर मनपात परिवर्तन घडविण्याची भाषा भाजपने सुरू केलेली असली, तरी याच पक्षाच्या एका नेत्याने मनपा निवडणुकीत तुम्हाला म्हणजे काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी प्रचार बैठकीत केला.

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार चव्हाण यांनी रविवारी सकाळच्या सत्रात शिवाजीनगर प्रभागात दोन वेगवेगळय़ा ठिकाणी प्रचार बठका घेतल्या. उद्योगपती ओमप्रकाश गिल्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बठकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेलच, याबद्दल खात्री व्यक्त केली. त्याच वेळी काँग्रेसच्या बहुमताबद्दल प्रमुख विरोधक असलेल्या भाजपची खात्री पटल्याचे सांगताना भाजप नेत्याने एका भेटीत वर्तविलेला अंदाज चव्हाण यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या बठकीत उघड केला. पण या नेत्याचे नाव सांगण्याचे त्यांनी टाळले.

नांदेड शहरात आणि मनपात आम्ही काहीच केले नाही, असा प्रचार भाजपने चालवला आहे. त्यावर भाष्य करताना मागील तीन वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. या दोन सरकारांच्या माध्यमातून त्यांनी नांदेड शहराला काय दिले, ते आधी जनतेला सांगावे, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली.

आम्ही नांदेडच्या विकासाची जबाबदारी जशी घेतली, तशी निभावली. या शहराला आम्ही आमच्या जीवनाचा हिस्सा मानतो. त्यामुळे मतदारांनी काँग्रेस पक्षाला बहुमत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या बठकीत विसावानगरच्या रहिवाशांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. आमदार डी. पी. सावंत यांनी आपल्या भाषणात शाश्वत विकासासाठी खासदार अशोक चव्हाण यांना बळ देण्याची विनंती केली. विरोधकांकडे चव्हाण यांच्या तोडीचा नेता नाही. भाजपने तर आपल्या मूळ कार्यकर्त्यांना घरी बसवून आयारामांना उमेदवारी दिली. नांदेडचा भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे. त्यांना मत देण्याऐवजी खऱ्या काँग्रेसलाच मत द्या, असे आमदार सावंत म्हणाले. या वेळी गिल्डा यांनी खासदार चव्हाण व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास दाड यांनी केले.