चलन तुटवडा जाणवत असल्याने एटीएम सेवा अधूनमधून विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सावंतवाडी भारतीय स्टेट बँकेने दोन हजार रुपयांच्या सुमारे शंभर कोटींच्या नोटांचे वाटप केले, पण बाजारात या दोन हजार नोटाच दुर्मीळ झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.  त्यामुळे दोन हजार रुपयांचा नोटा नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या सावंतवाडी शाखेकडे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून नाणे-पैसे वाटपासाठी पाठविले जातात. त्यानंतर मागणीप्रमाणे अन्य बँकांना पैसे वाटप करण्यात येत असतात. त्यामुळे या शाखेच्या जनरल व्यवस्थापकांना संपर्क साधला असता त्यांनी चलन तुटवडा होत असल्याचे मान्य केले.

या शाखेचे जनरल व्यवस्थापक नंदकुमार भोसले यांनी चलन तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही बँकांनी ठेवीदारांच्या मागणीनुसार प्रतिसाद देण्याचे टाळले आहे. चलन तुटवडा जाणवत असताना नोकरदारदेखील पगार एकाच वेळी काढत आहेत, असे भोसले म्हणाले.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या शंभर कोटींच्या नोटा आल्या होत्या. त्याचे वाटप करण्यात आले. या नोटा बाजारात खेळत्या राहायला हव्या होत्या, पण दोन हजार रुपयांच्या नोटा दिसत नाहीत. या नोटा नेमक्या कुठे गेल्या, असा प्रश्न शाखा व्यवस्थापक नंदकुमार भोसले यांना पडला. या नोटा पुन्हा साठवणूक करून ठेवल्या जात नसतील ना? असाही प्रश्न या चर्चेदरम्यान उपस्थित झाला.

यामुळे एटीएममध्ये नोटा ठेवताना थोडी काळजी घ्यावी लागते, तसेच दहा रुपयांची नाणी भारतीय रिझव्‍‌र्ह बँक बदलण्याची भीती अनेक लोकांना आहे. त्यामुळे दहा रुपयांची नाणी बँकेकडून बदलून घेण्यासाठी ठेवीदार, ग्राहक येत असल्याचे नंदकुमार भोसले यांनी बोलताना सांगितले.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून चलन तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एटीएममध्ये भरलेले पैसे पुन्हा लोड करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे काही बँका चलनानुसार सेवा देत असल्याचे पुढे आले आहे.

लग्नसराई, पावसाळी हंगामामुळे चलन तुटवडय़ावर रिझव्‍‌र्ह बँकेने तातडीने उपाय आखावेत, अशी मागणी आहे.