नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या नुकसानीप्रकरणी निलंगा पोलिसांनी सुमारे ८० ते ९० आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यातील १२ आरोपींना अटक झाली असून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
निलंग्याच्या नगराध्यक्ष विद्याताई धानोरकर यांच्या घरावर हल्ला करून कुटुंबीयांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, भाजप, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, वीरयोद्धा संघटना यांसह विविध पक्ष व संघटनांच्या वतीने मंगळवारी (दि. २३) निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. बंददरम्यान शहरातील चार ते पाच हातगाडय़ांचे ४ हजार रुपयांचे नुकसान व बसेसच्या काचा फोडल्याने ३१ हजार ५०० रुपयांचे नुकसान, एका खासगी मालवाहतूक गाडीचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले.
या नुकसानीबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेत निलंगा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांच्या फिर्यादीवरून प्रवीण धानोरकर, भास्कर धानोरकर, विकास बिराजदार, किशोर जाधव, शिवा गंपले, राणा आर्य, शैलेश धानोरकर, सागर पाटील, बाळू मणियार, किशोर लंगोटे, उद्धव वडापाववाला, विनोद सोनवणे, धनाजी चांदुरे यांच्यासह इतर ८० ते ९० आंदोलनकर्त्यांविरुद्ध बंदची परवानगी नसताना गरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. यातील १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयासमोर बुधवारी उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, मूळ प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरारच आहेत.