मागील २००९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीवेळी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील तहानलेल्या ३५ गावांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे सत्ताधारी काँग्रेस आघाडीने दुर्लक्षच केले. पाणी देण्याची ग्वाही देणाऱ्या काँग्रेस आघाडीने प्रत्यक्षात पाणी न देता मतदारांची फसवणूक केली. तेव्हा यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारत धडा शिकवावा, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांनी केले.
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर, मरवडे, डोणज आदी गावांमध्ये भाजपच्या प्रचार सभा झाल्या. त्या वेळी अॅड.बनसोडे यांनी ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत मंगळवेढा भागातील धोंडा व परिसरातील ३५ गावांतील मतदारांनी पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु त्या वेळी सत्ताधारी मंडळींनी तातडीने हा दुर्लक्षित पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत हा पाण्याचा प्रश्न जशाच्या तसाच आहे. इतकेच नव्हे तर, सत्ताधारी मंडळी निर्लज्जपणे पाण्याचा प्रश्न उपस्थित करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यात व देशात सत्ता असताना काँग्रेस व राष्ट्रवादीने हा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल बनसोडे यांनी केला. मतदारांनी आता पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या खोटेपणाला बळी न पडता आपल्यावरील अन्यायाचा हिशेब चुकता करावा. लोकसभा निवडणुकीत ही संधी मतदारांनी गमावता कामा नये, असे ते म्हणाले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, दामोदर देशमुख आदींची भाषणे झाली.