“आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मात्र खासदार इम्तियाज जलील आजही संभाजी नगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले, यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे असल्याचे दिसते,” अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे. स्वतःला निजामाचे वारस समजणाऱ्या जलील यांनी आपल्या आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली आहे.

“गेले अनेक वर्षे आमदार असतानाही आणि आता खासदार असताना देखील इम्तियाज जलील हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आणि निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला, त्या हुतात्म्यांना अभिवादन करणे त्यांना मान्य नाही का? ” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. जलील अजुनही स्वतःला निजामाचे गुलाम समजतात अशी टीका कायंदे यांनी केली.

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली. आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे. त्यावरून आता राजकारण तापू लागलं आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यापासून इम्तियाज जलील हे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जलील यांचा विजय झाला आणि ते औरंगाबादचे खासदार झाले. त्यामुळे यंदा ते मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे सर्वांना अपेक्षित होते.