विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवड्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. आज मंत्रीमंडळाची मुदत संपत असल्याने विरोधकांनी युतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन न करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विटवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘मी पुन्हा येईन’ वरुन निशाणा साधला. मात्र हे ट्विट करताना त्यांनी व्याकरणाची एक चूक केली. विशेष म्हणजे ही चूक थेट गायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

पाटील यांनी ट्विटवरुन भाजपाला सरकार बनवणे शक्य होत नसल्याचा टोला लगावत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. “मी पुन्हा येईल म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीये, म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू,” असे ट्विट पाटील यांनी केले.

मात्र या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ‘मी पुन्हा येईन’ ऐवजी ‘येईल’ असा शब्द वापरला. पाटील यांची हीच चूक अवधूत गुप्तेने पकडली. हे ट्विट कोट करुन रिट्वीट करत त्याने असं चुकीचं वाक्य कोणं म्हणालं अशी विचारणा केली. “ते राजकाराणाचं जाऊ दे.. येई’न’ ऐवजी येई’ल’ कोण म्हणाले तेवढे सांगा,” अशी प्रतिक्रिया अवधुतने ट्विटवर दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने संतापल्याचे इमोजीही वापरले आहेत.

दरम्यान, अवधुतने पाटील यांची चूक दाखवली असली तरी ही चूक दाखवताना केलेल्या ट्विटमध्ये त्याचे एक चूक केली आहे. राजकारणाचं ऐवजी त्याने ‘राजकाराणाचं’ असं शब्द लिहिला आहे.