मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा किं वा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला असून पुणे, नाशिक व नागपूरच्या काही भागांत तुलनेत पाऊस कमी झाला. अतिवृष्टी किं वा पुराचा राज्याच्या काही भागांना फटका बसला असला तरी धरणांमधील जलसाठा पुरेसा झालेला नाही.

यंदा कोकण, पश्चिाम महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसला. सध्या राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असला तरी खान्देश नाशिक आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यानापर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत पुणे, नाशिक आणि नागपूर विभागांत पाऊस कमी झाला. सप्टेंबरचे दोन आठवडे व परतीच्या पावसात ही कसर भरून निघावी, अशी आशा सरकारी यंत्रणा करीत आहेत. १८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर १६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. (मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांचा समावेश नाही).

नंदुरबार जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ५२ टक्के च पाऊस झाला आहे. मराठवाड्यावर नेहमीच दुष्काळाचे संकट उभे ठाकते. यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. मराठवाड्यातील धरणे आतापर्यंत निम्मी भरली आहेत.

राज्यातील जलाशयांमध्ये पुरेसा साठा अद्याप झालेला नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील धरणे सरासरी ७५ टक्के  भरतात. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये ८१ टक्के  पाण्याचा साठा झाला होता. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६७.६ टक्के च जलसाठा झाला आहे.

नागपूर विभागात ५४ टक्के  तर  नाशिक विभागातील धरणांमध्ये ५७.१३ टक्के  साठा झाला आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये ५० टक्के  साठा झाला तरी गेल्या वर्षी याच काळात मराठवाड्यात ७० टक्के धरणे भरली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा धरण हे ९८ टक्के  भरले आहे. कोयना धरणही ९९ टक्के  भरले आहे.

सरासरीएवढा किं वा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेले जिल्हे : बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नगर, धुळे, सांगली.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे : ठाणे, रायगड, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, नाशिक, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर.