|| प्रशांत देशमुख

आयुष मंत्रालयाच्या निकषाने खासगी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले

‘आयुष’ मंत्रालयाद्वारे संचालित आयुर्वेद व तत्सम चिकित्सा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘परसेंटाइल’सह अन्य कठोर निकष लावण्यात आल्याने, अशी महाविद्यालये संचालित करणाऱ्या शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहे.

‘आयुष’ अंतर्गत आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी अशा भारतीय चिकित्सा शाखा संचालित केल्या जातात. मात्र, या सर्व शाखांतील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी काही बदल या वर्षीपासून लागू करण्याचे ‘आयुष’ मंत्रालयाने १५ जूनच्या आदेशातून स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचा बदल म्हणजे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या वर्षीपासून ‘परसेंटाईल’ सूत्र लागू करण्यात आले आहे. वैद्यकीय व दंत शाखा वगळता उर्वरित आयुष शाखांना प्रवेशासाठी गेल्या वर्षी ‘कट ऑफ ’ लागू नव्हते. गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षा दिल्यानंतर किमान एक गुण मिळणारा विद्यार्थीही ‘आयुष प्रवेशासाठी पात्र ठरत होता. या वर्षीचा ‘कट ऑफ ११९ गुणांचा आहे. म्हणजेच वैद्यकीय व दंत शाखेप्रमाणेच आयुष शाखेत प्रवेश घेण्यासाठी ११९ गुण मिळवणाराच विद्यार्थी पात्र ठरेल. परिणामी, अशा महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे येत्या दोन वर्षांत आयुष चिकित्सा पद्धतीच्या एकाही नव्या महाविद्यालयास मान्यता दिली जाणार नाही. तशा सूचना राज्य सरकार व विद्यापीठांना देण्यात आल्या आहे. पदव्युत्तर पदवीसाठीही ‘नीट’ दिल्याखेरीज प्रवेश मिळणार नाही. आयुषच्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी पात्रता परीक्षा, ‘आयुष नेट’ लागू होत आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, रुग्णालयातील सेवकांसोबतच पदव्युत्तर शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हजेरीची नोंद ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने करण्याचे निर्देश आहे. या बदलांमुळे आयुष शाखेतील शिक्षणाचा दर्जा उंचावेल. तसेच आरोग्य सेवेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास आयुष मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

देशभरात सातशेवर आयुष महाविद्यालये चालवली जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी प्राध्यापक, विद्यार्थी, आरोग्य यंत्रणा कागदोपत्रीच असल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले होते. या शाखांतील आरोग्य सेवा अत्यंत निष्काळजीपणे हाताळली जात असल्याचा समज दृढ होत चालला होता. या पाश्र्वभूमीवर हे बदल आले आहे. मेघे अभिमत विद्यापीठाच्या महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांनी या बदलांचे स्वागत केले आहे.

नव्या बदलामुळे शिक्षणाचा स्तर उंचावणार आहे. त्यामुळे ते स्वागतार्ह आहे.  – डॉ. जयंत देवपुजारी, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेचे नियोजित अध्यक्ष