News Flash

बहुजन क्रांती मोर्चाही राजकीय रिंगणात!

बहुजन क्रांती मोर्चे काढू नयेत अशीच भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या नेत्यांनी घेतली होती.

राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय; आगामी निवडणुका लढविणार

मराठा क्रांती मोर्चाला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादानंतर संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून काढल्या जात असलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनीही राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा नगरमध्ये सोमवारी केली. बहुजन क्रांती आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी केली जाणार आहे. या आघाडीने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शरद तायडे (नाशिक) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही स्वबळावर लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीत घेण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चातून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरूस्तीची मागणी पुढे आल्यानंतर विविध समाजांतील संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला मोर्चा २४ ऑक्टोबरला नगरमध्ये काढला गेला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. आता संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केल्यापाठोपाठ बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनीही राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक अशोक गायकवाड, प्रा. किसन चव्हाण, शिवाजी ढवळे, संतोष रोहम, विजय वाकचौरे, अशोक आल्हाट, दीपक पाटील, सुरेश वाघ आदी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या संयोजकांनी बहुजन क्रांती आघाडी नावाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली जाणार असल्याची तसेच त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे येत्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणार असल्याचे व पक्षचिन्ह निवडणार असल्याची माहिती दिली.

बहुजन क्रांती मोर्चे काढू नयेत अशीच भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या नेत्यांनी घेतली होती. मात्र प्रस्थापित नेते व राजकीय पक्ष यांच्या शोषणाच्या विरोधात प्रचंड असंतोष असल्याने मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. नेते व कार्यकर्ते यांच्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी व पुढील वाटचालीस राजकीय पर्याय देण्यासाठी बहुजन क्रांती आघाडी म्हणून राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक गायकवाड यांनी सांगितले. बहुजन समाजातील ओबीसी, भटके विमुक्त, दलित, आदिवासी, मुस्लिम यांना एकत्र करून आता आम्हाला आमच्या अस्मितेची लढाई करायची आहे, असे शिवाजी ढवळे म्हणाले. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या प्रस्थापित नेत्यांनी आमचे शोषण केले. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु मराठा मोर्चाच्या फलकावरून शाहू, फुले, आंबेडकर गायब केले गेले आणि तेथे केवळ छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांचेच छायाचित्र आले, हे कसे घडले? सत्तेचा लाभ केवळ मूठभरांना मिळतो आणि सर्वात मोठा वर्ग असलेला बहुजन वंचित राहतो हे आता चालणार नाही, असे प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले.

२१ जानेवारीला मुंबईत मोर्चा

राज्यातील १६ जिल्हय़ांत बहुजन क्रांती मोर्चा विविध विचारांच्या संघटनांनी एकत्र येऊन काढला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, त्याचा समारोप येत्या २१ जानेवारीला मुंबईत मोर्चा काढून केला जाणार असल्याचे विजय वाकचौरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:33 am

Web Title: bahujan kranti morch political election
Next Stories
1 जयंत पाटलांवरील संशयातूनच सांगली जिल्हा बँकेची चौकशी
2 एटापल्लीसह परिसरातील ७० गावांमध्ये खाणीविरोधात निषेधाचा नारा
3 सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार – अनिल पारस्कर
Just Now!
X