सत्पाळ्यात पराभव; पालीमध्ये सत्ता कायम

वसई : वसईतील सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला आहे. ग्रामसमृद्धी पॅनलने ११ पैकी नऊ जागा जिंकून बविआला धूळ चारली. मात्र पाली ग्रामपंचायत बविआने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. पाली ग्रामपंचायतीमध्ये बविआने महाविकास आघाडीचा पराभव करत सातपैकी सहा जागा जिंकल्या आहेत. तर पालघरमध्ये  सागावे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलने बाजी मारली आहे.

वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या होत्या. त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले. सत्पाळा ग्रामपंचायत बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात होती. बविआचा शह देण्यासाठी मनसे, निर्भय जनमंच, आदिवासी एकता परिषद आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून ग्रामसमृद्धी पॅनल उभे केले होते. त्यामुळे बविआ विरुद्ध ग्रामसमृद्धी पॅनल अशी सरळ लढत होती. या लढतीत ११ पैकी नऊ जागा ग्रामसमृद्धी पॅनलने जिंकल्या आणि बविआचा धुव्वा उडवला. ग्रामसमृद्धी पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मर्शान लोबो, प्रकाश डिकुन्हा, उमेश पाटील, मनोज वरठा, संगीता भंडार, राजेश गायकवाड, राहुल किणी, गीता ठाकूर, कविता पाटील आदींचा समावेश आहे. तर बविआचे ज्योती दिब्रिटो आणि साक्षी कामतेकर हे दोन उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे प्रथमच मनसेचे सहा उमेदवार जिंकून आले आहे. बविआच्या भ्रष्टाचार आणि मनमानीपणाविरोधात जनतेने दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे तालुकाप्रमुख प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत उमेश पाटील आणि कविता पाटील हे दाम्पत्य विजयी झाले आहे.

पालीमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा

नायगावमधील पाली ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात ‘बविआ’ला यश आले आहे. ‘बविआ’ विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी होती. सातपैकी सहा जागा बविआने जिंकल्या आहेत. सहापैकी  तीन जागा यापूर्वीच त्यांनी बिनविरोध जिंकून आल्या होत्या. उर्वरित चार जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते त्यात सचिन डिसोजा, ओल्गा दुरगुडे आणि जसिंटा ग्रेसियस हे जिंकून आले. तर शिवेसनेच्या जयश्री चौथवे विजयी झाल्या. ओल्गा दुरगडे या अवघ्या एक मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या स्वीटी बार यांना ५० मते मिळाली, तर दुरगडे यांना ५१ मते मिळाली. विजयाचे शिल्पकार नितीन ठाकूर यांना मानले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा गड कायम ठेवला. हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे त्यांनी सांगितले.

सागावे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनल

पालघर: पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या चार जागा ग्रामविकास पॅनेलने  जिंकल्या आहेत. सागावे ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य संख्या असून या निवडणुकीत या अगोदर तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी दोन सदस्य ग्रामविकास पॅनलचे तर एक युवा परिवर्तन विकास पॅनलचा आहे. ग्रामविकास पॅनलने बहुमताचा आकडा पार केला आहे.  प्रभाग एक मधून आकाश सुरेश पाटील या  युवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराने ग्रामविकास पॅनलचे उमेदवार पंढरी (प्रमोद) पांडुरंग पाटील यांचा तीन मतांनी पराभव केला आहे. अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागेवर मिनल महेश वरठा, दीपाली दिनेश राव, ममता मंगेश गायकवाड , तर सर्वसाधारण जागेवर मनीषा नरेश सातवी आणि अनुसूचित जमाती या जागांवर शाम तुळशीराम पवार व संदेश रवींद्र खटाळी हे निवडून आले आहेत.