मोहोळ पोलीस ठाण्यावर अटक मोर्चा काढून दगडफेक करून १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जखमी केले तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांना अखेर दहा दिवसांनंतर सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या इतर समर्थकांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
मोहोळ राखीव मतदारसंघातून पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणारे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेले आमदार कदम हे सतत वादाच्या भोवऱ्यात राहात आले आहेत. चौपदरीकरण झालेल्या सोलापूर-पुणे महामार्गाच्या ठिकाणी मोहोळ येथे पुलाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संरक्षणासाठी लोखंडी जाळी बसविली असताना आमदार कदम यांच्या सांगण्यावरून ही जाळी परस्पर काढून तेथे अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे आमदार कदम यांच्यासह तिघाजणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईमागे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांचाच हात असल्याचा समज करून घेत आमदार कदम यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात स्थानिक वृत्तपत्रात पानभर जाहिरात प्रसिद्ध करीत आणि आव्हान देत गेल्या ४ जुलै रोजी मोहोळ पोलीस ठाण्यावर ‘अटक मोर्चा’ काढला होता. पोलिसांनी अटकेच्या कारवाईची गरज नसल्याचे स्पष्ट करूनदेखील आमदार कदम यांनी काढलेल्या या ‘अटक मोच्र्या’ला हिंसक वळण लागले आणि त्यात कदम यांच्या समर्थकांनी मोहोळ पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. त्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १७ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आमदार कदम यांच्यासह त्यांच्या ५४ समर्थकांना अटक केली होती. या सर्वाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असता सर्वाची रवानगी कोल्हापूरच्या कळंबा रोड कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, आमदार कदम यांनी सोलापूरच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी होताना जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी सरकारचे म्हणणे मांडण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ मागितली. त्यामुळे जामीन अर्जावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलावी लागल्याने आमदार कदम यांचा कारागृहातील मुक्कामही वाढला होता.
तथापि, अखेर सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी सरकारचे म्हणणे मांडले, तर आमदार कदम यांच्याकडून अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी बाजू मांडली. जिल्हा सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी आमदार कदम यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यासाठी ३० हजारांच्या जातमुचलक्याची तसेच साक्षीदारांवर तसेच तपास यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा दबाव न आणण्याची आणि पुन्हा अशा प्रकारचे कृत्य न करण्याची तसेच दर रविवारी मोहोळ पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट आमदार कदम यांच्यावर लादण्यात आली.