काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले याचा तपशील माझ्याकडे आहे. आत्ता जे ते सत्तेत गेले आहेत ते फक्त नशीबाने गेले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळालं तेदेखील नशीबाने मिळालं. मात्र बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करण्याच्या विचारात होते असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र निकालानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये इच्छुक असल्याचं वृत्त समोर आलं होतं. याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.

एकीकडे भाजपातूनच पक्षविरोधी काम केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील सहन करत आहेत. अशात आपल्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत माझी कोणतीही भेट झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात असलेलं वैर महाराष्ट्राला ठाऊक आहे. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आता नशिबाने सरकारमध्ये आहेत. एक काळ होता की तेही भाजपात प्रवेश करणार होते. ते कुणाला भेटले याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. थोरात अपघाताने सत्तेत आले. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाचा फुटबॉल झाला आहे.” अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप केले आहेत.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. “महाविकास आघाडीचा नवीन संसार सुरु झाला आहे. काळाच्या ओघात त्यांना एकमेकांचे गुण आणि खोड्या कळतील” असा टोलाही विखेंनी लगावला.