हिंगोली शहर पोलीसांनी आठ दिवसांपूर्वी कत्तलखान्यात जाणार्‍या ४१ गोवंशांची अर्थात बैलांची सुटका केली होती. मात्र, आता या बैलांच्या पालनपोषणाचे नवे शुक्लकाष्ट शहर पोलीसांच्या मागे लागल्याने गोहत्या बंदी कायद्याचा नवा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भोपाळवरून हैद्राबादच्या कत्तलखान्यात २३ मार्चला ४१ बैल ट्रकमधून नेत असताना हिंगोली शहर पोलीसांनी हा ट्रक ताब्यात घेतला होता. तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन सर्व बैलांना पोलीस ठाण्याच्या आवारात उतरवून घेण्यात आले होते. यांपैकी आतापर्यंत तीन बैलांचा मृत्यु झाला आहे. तर उर्वरीत ३८ बैल सांभाळण्याची जबाबदारी पोलीसांवर येऊन पडल्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी की या बैलांचे पालनपोषण करावे असा प्रश्न हिंगोली पोलीसांना सतावत आहे.

समाजसेवेच्या नावाखाली गवत, कडबा, ढेप गोवंशाला खाण्यास देतानाची छायाचित्रे काढून लोक प्रसिद्धीची हौस पुर्ण करतात. मात्र, आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या या ३८ गोवंशांकडे अशा कथित समाजसेवकांचे लक्ष नाही. या प्राण्यांना जगण्यासाठी चारा-पाणी मिळणे सध्या अवघड झाले आहे. या गोवंशाचे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सध्या एक खाजगी महिला व दोन पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

मुक्कामी असलेल्या गोवंशांना पाहण्यासाठी ग्रामीण भागातून काही शेतकरी आले होते. त्यांचे बैल चोरीला गेल्याने या बैलांमध्ये ते दिसून येतात का म्हणून त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांना बैलांच्या पालनपोषणाबाबत विचारले असता, एका बैलजोडीला सकाळी किमान दहा पेंढ्या व रात्री वीस पेंढ्या घालाव्या लागतात. त्यात ढेप वगैरे खुराक असेल तर तो वेगळा परंतू एका बैलजोडीला किमान ३० पेंढ्या आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे अशी सगळी कसरत पोलिसांना करता येणे शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गोहत्या बंदीच्या नव्या कायद्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीसांच्या माथीच आता गोवंश सांभाळण्याची जबाबदारी पडल्याने यातून काय मार्ग निघेल, न्यायालय याबाबत काय निर्णय देईल? याकडे पोलीसांचे लक्ष लागले आहे.