बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणा अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. परळीतील संत जगमित्र सूत गिरणीच्या ३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडेंसह इतर ८ जणांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. ३ कोटींची वसुली करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे कार्यालय, घर आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची न्यायालयीन प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, जी सुरु झाली आहे. या घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. धनंजय मुंडे यांचं घर, सूतगिरणीचं कार्यालय विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता यांचे व्यवहार यापुढे करता येणार नाहीत आणि त्यातून लाभ घेता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बीड जिल्हा सहकारी बँकेने संत जगमित्र सहकारी सूत गिरणीला कर्ज देताना नियम धाब्यावर बसवले. नियमांना फाटा देऊन कर्ज वितरण करण्यात आले. या प्रकरणी ऑक्टोबर २०१३ मध्ये परळी शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विशेष तपास पथकाने तीन वर्षांनी जुलै २०१६ मध्ये दोषारोप पत्र परळी न्यायालयात दाखल केलं होतं. आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.