दुष्काळ, पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर मद्य व बीअर उद्योगाला लागणाऱ्या पाण्याचा मुद्दा चच्रेत येईल, म्हणून उत्पादन घटल्याची हाकाटी पिटली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जूनपर्यंत पाणीकपात लागू झाली नव्हती. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च ते जून दरम्यान एक कोटी लिटर बीअर अधिक उत्पादित झाल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. मात्र, पाणीकपात झाली तर बीअर उद्योगही टँकरवर विसंबून राहू शकेल.
जुलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पाऊस न झाल्याने मराठवाडय़ात पिण्यासाठी टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. गेल्या आठवडय़ात ५७२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांत ७० टँकर वाढले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयातील साठा दिवसेंदिवस कमी होत असला, तरी पिण्याच्या पाण्याची अडचण तातडीने जाणवणार नाही. मात्र, येत्या काही दिवसांत उद्योगाच्या पाण्यात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीअर व मद्य उद्योगातील मंडळींनी उत्पादन घटत असल्याची हाकाटी पिटण्यास सुरुवात केली. वास्तविक, विदेशी मद्य, बीअर व देशी दारूच्या उत्पादनात तुलनेने वाढ झाली आहे. या क्षेत्रातून विक्रीकरातून मिळणाऱ्या महसुलात काही प्रमाणात घट दिसून आल्याने उत्पादन क्षमतेचा आढावा घेण्यात आला. यात उत्पादन वाढल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.
औरंगाबादमध्ये विदेशी मद्याचे चार कारखाने आहेत. युनायटेड स्पीरिट, एबीडी प्रायव्हेट लिमिटेड, डायजिओ, रॉडिको एन व्ही आदी कंपन्यांनी मार्च ते जून या कालावधीत १ कोटी ५५ लाख लिटर विदेशी मद्य उत्पादित केले. या वर्षी त्यात २ लाख लिटरची वाढ झाली, तर बीअर उत्पादनातही वाढ दिसून आली. गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या कालावधीत ७ कोटी ८२ लाख लिटर बीअर उत्पादन करण्यात आले होते. या वर्षी मार्च ते जून या कालावधीत ८ कोटी ८० लाख लिटर उत्पादन झाले. म्हणजे एक कोटी लिटर बीअर उत्पादन अधिक झाले. देशी दारू निर्मितीत वाढच आहे. पाणी कमी मिळत असल्याने उत्पादनात घट होत असल्याची नुसतीच हाकाटी पिटली जात आहे. मागील दुष्काळात बीअर उत्पादक कंपन्यांनी टँकरने पाणी घेतले होते. अजून तशी वेळ आली नाही. पाऊस लवकर आला नाही तर मात्र नजीकच्या काळात काही परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
विक्रीकरात घट, उत्पादनात वाढ!
मद्य आणि बीअर विक्रीतून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत असल्याने महसूल गोळा करणाऱ्या यंत्रणांचे त्यावर बारीक लक्ष आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात ८३७ कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर १३४ कोटी ६७ लाख रुपये विक्रीकर मिळाला होता. या वर्षी त्यात घट झाली. मात्र, ही घट उत्पादन घटल्यामुळे नसल्याचे दिसून आले. यू. बी अजंता कंपनीने त्यांचे लेखे मुंबईस हलविल्याने औरंगाबाद येथील विक्रीकर काहीसा घसरलेला दिसत असल्याचे विक्रीकर विभागातील अधिकारी सांगतात. मात्र, पाणी नाही म्हणून उत्पादन घटले ही वस्तुस्थिती नाही.