मिल्टन सौदिया

करोनाच्या टाळेबंदीमुळे ओढवलेल्या बेरोजगारीच्या संकटाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.  वसईच्या पश्चिम पट्टय़ातील शेतामध्ये भुरटय़ा चोरांनी हैदोस घातला आहे. भाजीपाल्याची चोरी तसेच पिकांना आगी लावण्याचे प्रकार  वाढल्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील हरित पट्टय़ांतील अनेक गावांमध्ये भुरटय़ा चोरांनी स्थानिक शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले आहे. सकाळी शेतातील काम आटोपले की शेतकरी दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी घरी येतात.   टाळेबंदीपूर्वी दिवसभर शेतात आदिवासी मजूर असायचे. मात्र, आता मजूरही आपापल्या गावी निघून गेल्यामुळे दुपारच्या वेळी शेते निर्मनुष्य असतात. या स्थितीचा गैरफायदा घेऊन काही भुरटे चोर शेतातील विविध प्रकारच्या भाजीपाल्यासह केळी, आंबा, फणस आदी लंपास करू लागले आहेत. काही ठिकाणी पिकांना आगीदेखील लावल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील जॉय फरगोज यांच्या शेतातील केळ्यांचे लोंगर तसेच भाजीपाला चोरीस गेला आहे. तर वाघोली येथील दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावरील सर्व आंबे अज्ञात चोरटय़ांनी लंपास केले आहेत. सत्पाळा परिसरात राहणाऱ्या संदेश तुस्कानो यांच्या शेतातील नारळाच्या झाडांवरील नारळ चोरीस गेले आहेत. याशिवाय नंदाखाल, नानभाट, राजोडी, आगाशी आदी परिसरांतील शेतकऱ्यांच्या शेतातही अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पूर्वी शेतात अधूनमधून चोरीच्या घटना घडत असत. आता टाळेबंदीच्या काळात वारंवार अशा घटना घडू लागल्यामुळे या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

भुरटय़ा चोरांविषयीच्या तक्रारी आलेल्या आहेत. चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.

– श्रीरंग गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे.

माजी नगरसेवकाकडून तडीपारांवर आरोप

नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा, डांगेवाडी, एंडाळेवाडी येथे राहणारे काही गुन्हेगारी वृत्तीचे तडीपार इसम स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात चोऱ्या करत असल्याचा आरोप माजी नगरसेविका जोस्पीन फरगोज यांनी केला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात कोणी नसताना त्याठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करणे, हरकत घेणाऱ्या शेतकऱ्यास धमकावणे यांसारखे प्रकारही घडू लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. आज गावाबाहेरील इसम गावातील शेतात येऊन चोरी करतात, उद्या घरात घुसून चोरी करतील, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे. अशांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी फरगोज यांनी केली आहे.

‘वायू’ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई नाहीच

गेल्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या वसईच्या पश्चिम पट्टय़ातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. वायू वादळामुळे भुईगाव, राजोडी, वाघोली, सत्पाळा, नाळा, वाळुंजे, आगाशी, वटार इत्यादी ठिकाणच्या केळीच्या बागांचे फार मोठे नुकसान झाले होते. वर्षभर मेहनत करून, खतपाणी देवून वाढवलेली केळीची झाडे फळ लागण्याच्या मार्गावर असतानाच जमीनदोस्त झाली होती. ‘शासनाकडून निधी आलेला आहे, लवकरच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाईल’, असे सांगून पीडित शेतकऱ्यांची आजपर्यंत केवळ बोळवण करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी केळीच्या बागांमध्ये जाऊन केळ्यांचे लोंगर चोरणे, वाडीतील साहित्याची चोरी करणे, जमिनीची आणि केळ्यांच्या झाडांची नासधूस करण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. पोलिसांकडे तक्रार केली आहे.

– कॅलिस ब्रास, स्थानिक शेतकरी

भुरटय़ा चोरांविषयीच्या तक्रारी आलेल्या आहेत. चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.

– श्रीरंग गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे.