सुहास बिऱ्हाडे

जाहिरात ठेकेदारांच्या भांडणात वसई-विरार महापालिकेचा अनपेक्षितपणे आर्थिक फायदा झाला आहे. शहरातील जाहिरात फलकांचा ठेका पालिकेने खासगी ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याद्वारे पालिकेला वार्षिक ४० लाख रुपये मिळणार होते. मात्र ठेकेदारांचे वाद सुरू झाल्याने पालिकेने स्वत: हे काम हाती घेतले आणि चक्क तीन महिन्यातच अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले. वर्षभरात पालिकेला १० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

शहरातील जाहिरात फलकाद्वारे महापालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न मिळत असते. वसई-विरार महापालिकेने पालिकेने मागील वर्षी विजास कंपनीला वार्षिक अवघ्या ४० लाख रुपयांचा ठेका दिला होता. हा ठेका कमी रकमेचा असल्याने इतर जाहिरात कंपन्यांनी आक्षेप घेतला होता. नवीन आयुक्त गंगाथरन डी यांनी अभ्यास केला असता जाहिरात ठेक्यातून जास्त उत्पन्न मिळू शकते हे त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी विजास कंपनीला दिलेला वार्षिक ४० कोटींचा ठेका रद्द केला आणि नवीन दराप्रमाणे निविदा काढल्या. कुठल्याही एकाच ठेकेदाराला संपूर्ण शहराचा एकच ठेका न देता नऊ प्रभागात ९ ठेकेदार नेमण्याचे पालिकेने ठरवले होते. मात्र ठेका रद्द केल्याने जुना ठेकेदार विजास कंपनीने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ठेकेदारांच्या भांडणात पालिकेचे उत्पन्न बुडू लागले होते. त्यामुळे पालिकेने जाहिरात फलकांचे ठेके ठेकेदारांना न देण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: जाहिरात फलकांना परवानगी देण्यास सुरवात केली. यामुळे पालिकेला मोठा आर्थिक लाभ होऊ लागला.

याबाबत माहिती देताना पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे—पाटील (जाहिरात आणि कर) यांनी सांगितले की, आम्ही स्वत: शहरातील जाहिरात फलकांना शुल्क आकारून परवानगी देण्याचे ठरवले. त्यामुळे आम्हाला पहिल्या तीन महिन्यातच अडीच कोटी रुपये मिळाले. यामुळे वर्षभरात आम्हाला किमान आणखी सात कोटी रुपये मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्यासाठी हा सुखद धक्का होता.  ठेकेदारांची भांडणे आमच्या पथ्यावर पडली आणि आम्ही स्वत: परवाने देण्यास सुरवात केल्याने मोठय़ा प्रमाणात महसूल मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले. जर खासगी ठेकेदाराला आम्ही ठेका दिला असता तर त्याने वर्षांला आम्हाला केवळ ४० लाख दिले असते. परंतु आम्ही किमान वर्षांला १० कोटी रयत महसूल मिळवू असे ते म्हणाले.

अद्यापही एक लाख चौरस फुटांच्या जागेचे उत्पन्न पालिकेला मिळू शकणार आहे. त्यासाठी जाहिरात कंपन्यांनी पालिकेला संपर्क केला आहे. त्या जागांपोटी पालिकेला किमान ३ कोटी रुपये मिळू शकणार आहे. पालिकेने वार्षिक १० कोटींचे उत्पन्न सार्वजनिक जागेचे गृहीत धऱ्ले आहे. यानंतर खाजगी जागांमध्ये देखील जाहिरात फलकांना परवानगी देणार असून त्याद्वारे पालिकेला मोठा महसूल मिळणार आहे. ठेकेदारांच्या आपापसातील भांडणामुळे पालिकेला अशा प्रकारे कोटय़वधी रुपयांचा फायदा झाला आहे.

खासगी ठेकेदार आम्हाला फक्त ४० लाख वर्षांला देणार होता. सहा वर्षांत तो केवळ अडीच कोटी देणार होता. आता हे काम आम्ही स्वत: करण्यास सुरवात केली आहे. पहिल्या तीन महिन्यातच आम्हाला अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. वर्षभरात १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न आम्ही अपेक्षित धरले आहे

-प्रदीप जांभळे—पाटील, उपायुक्त, (जाहिरात आणि कर), वसई-विरार महापालिका