भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी प्रा. वरवरा राव यांना तेलंगणातून अटक केली आहे. राव यांना हैदराबादमधील न्यायालयातून दिलासा मिळू शकला नव्हता. अखेर या प्रकरणात राव यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणात पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती. मात्र, आपल्यावर केलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत यातील काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वरवरा राव हे स्थानबद्ध होते.

शनिवारी रात्री पुणे पोलिसांच्या एका पथकाने वरवरा राव यांना हैदराबादमधील निवासस्थानातून अटक केली. ‘हैदराबाद हायकोर्टाने तीन आठवड्यांसाठी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत आज (शनिवारी) संपली. तसेच त्यांनी हैदराबादमधील न्यायालयात केलेला अर्जही शनिवारी फेटाळण्यात आला होता. यानंतर वरवरा राव यांना अटक करण्यात आली’, अशी माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्तांनी दिली. राव यांना रविवारी पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, नक्षलवादी संघटनांच्या केंद्रीय समितीचा प्रमुख चंद्रशेखर हा वरवरा राव यांच्याशी ईमेलद्वारे संपर्कात होता. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिग, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि महेश राऊत यांना अटक केल्यानंतर ४ जुलै रोजी चंद्रशेखर यांनी ईमेलद्वारे चिंता व्यक्त केली होती, असा दावा पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी न्यायालयात केला होता.