राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा सोमवारी सांगलीत होत असताना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी रविवारी मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांची भेट घेऊन श्री. माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर यांनी गेल्या आठवडय़ात शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पक्षाचे बिनीचे शिलेदार भाजपा व सेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी सोमवारी पक्षाने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यास जतच्या विलासराव जगताप वगळता सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
    सांगलीत होणाऱ्या निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने विधानसभेसाठी उमेदवारी दिली तर वाळवा मतदार संघातून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना राजकीय आव्हान देण्याची श्री. माने यांची तयारी आहे.
पावसकर गटाचा आज भाजप प्रवेश  
हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष व युवा नगरसेवक विक्रम पावसकर यांचा सहकाऱ्यांसमवेत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या, सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत कोळे (ता. कराड) येथे होणाऱ्या परिवर्तन मेळाव्यात ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर कराड दक्षिणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटसकर, विक्रम पावसकर उपस्थित होते.
कोळे येथे भव्य परिवर्तन मेळावा होणार असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार संजय पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे यांची उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यानंतर कराडच्या पलाश मंगल कार्यालयात पावसकर समर्थकांचा मेळावा होणार आहे. कराड दक्षिणमधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून, मुख्यमंत्र्यांनी दक्षिणमध्ये काहीही ठोस कार्य केलेले नसल्याने त्यांना कराड दक्षिणेत रोखून धरण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे विजय मिळवण्याची तयारी केली गेली आहे. सातारा जिल्ह्यातील पाच जागा भाजपसाठी मागितल्या आहेत. यात कराड दक्षिण, सातारा व माण खटाव या जागावर भाजपचा हक्क असून, या जागा कोणत्याही परिस्थितीत घटक पक्षांना सोडणार नाही. पक्षाकडे मुलाखती दिल्या असल्या, तरी पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.