भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लिन चीट म्हणजे भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांना कशाप्रकारे वाचवतं याचं उदाहरण आहे, अशी टीका या प्रकरणात खडसेंविरोधात लढा देणा-या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे असताना त्यांना क्लीन चिट कशी मिळू शकते?,’ असा सवालही दमानिया यांनी केला आहे. शिवाय आपण या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी ऑगस्ट 2017 मध्येच मी खडसेंच्या विरोधातील सर्व पुरावे एसीबीकडे दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सर्वांनाच क्लीन चिट देत आहेत. त्यातलाच हा प्रकार तर नाही ना? अशी शंका उपस्थित करताना भाजपा सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ( एसीबी) क्लीन चीट देण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला. तसेच आपण या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्या म्हणाल्या. ट्विटरद्वारे त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान , यापूर्वी पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना फायदा दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर होता.