विरारमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान विरारमधील घटनेवरुन भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान राजेश टोपेंच्या एका वक्तव्यामुळे अतुळ भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी विरारमधील दुर्घटना राज्य सरकारची अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राजेश टोपेंच्या या वक्तव्यावरुन भाजपा नेते टीका करत आहेत.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

राजेश टोपे काय म्हणाले –
पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं म्हटलं आहे. “पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत,” असं टोपेंनी सांगितलं.

त्यावर पत्रकाराने १३ जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाहीय का?, असं विचारलं. यावर उत्तर देताना, “अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून ५ लाखांची, राज्य सरकारकडून पाच लाखांची अशी दहा लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. १० दिवसात यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे. आमच्या सद्भभावना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत,” असं टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. “उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.