जनतेने भाजपला विश्वासाने निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, शिवाय शेतकरी राजाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्ह्य़ातील सेलसुरा येथील सभेत केला.

हल्लाबोल यात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही. सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ठाकरे उपस्थित होते. हल्लाबोल यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात देवळी येथून झाली. नेत्यांनी एका जििनगमध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.