*  महापौरांनी नगरसेवकाच्या दिशेने नेमप्लेट भिरकावली * ’  सभापतीची नगरसेवकाला अश्लील शिवीगाळ * ’  भाजप-काँग्रेस नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी

चंद्रपूर : महापालिकेच्या आमसभेत ‘ना भुतो ना भविष्यती’ असा अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. सत्ताधारी भाजपच्या असंख्य अनियमितता व विसंगत कामांमुळे संतापलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा देताच महापौर राखी कंचर्लावार यांनी टेबलावरील नेमप्लेट नगरसेवकाला मारली, तर सभापती रवी आसवानी यांनी थेट नगरसेवक नंदू नागरकर यांच्या अंगावर धावून गेल्याने हातापाई झाली. सभागृहातील हा गोंधळ शांत करण्यासाठी चक्क आयुक्त राजेश मोहिते यांना महापौर व सभापतींना हात जोडून विनंती करावी लागली. या लाजीरवाण्या प्रकारामुळे सर्वाची मान शरमेने खाली झुकली आहे.

गुरुवारी एक वाजता सभा सुरू होताच मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अमजद अली, संगीता भोयर सभागृहात आले. लेखापरीक्षण अहवालातील २०० कोटींच्या कामातील अनियमितता, वीज केंद्रातील दोन संचांचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पिटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची आर्थिक लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले. हातात निषेधाचा फलक झळकावत हे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंचर्लावार यांनी टेबलवरील नेमप्लेट नगरसेवक नागरकर यांच्या दिशेने भिरकावली. त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर पुन्हा पाण्याची बॉटल भिरकावली. काँग्रेस नगरसेवक सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करीत असतानाच स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले व सभागृहातच अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचे लक्षात येताच शेवट आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्य धावत आले. त्यांनी दोघांना वेगळे केले.

विशेष म्हणजे, यावेळी आयुक्त मोहिते महापौर व सभापतींना हात जोडून शांत राहण्याची विनंती करीत होते. शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे, असा प्रकार यापूर्वी आमसभेत कधीही बघायला मिळाला नाही. दरम्यान, आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला. काँग्रेस सदस्याने महापौरांचा टेबल ठोकला. हे कृत्य महापौर आणि सभागृहाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले. तर महापौर राखी कंचर्लावार, सभापती रवी आसवानी यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी व करोना नियमांना पायदळी तुडवल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी, यासाठी काँग्रेस नगरसेवक नागरकर व सहकाऱ्यांनी लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली. महापौर व सभापतींनी  केलेला प्रकार अतिशय निंदनीय व लज्जास्पद आहे, याचा तीव्र शब्दात नगरसेवक पप्पू देशमुख यांनी निषेध नोंदवला. विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागरकर यांच्याविरुद्ध तक्रार

करोनात सभागृहाचे नियमांचे उल्लंघन करीत नगरसेवक नंदू नागरकर यांनी सभागृहात प्रवेश करीत घोषणाबाजी करून गदारोळ केला. इतकेच नव्हे तर पीठासीन असलेल्या महापौरांचे व्यासपीठ ठोकत इशारा देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पीठासीन असलेले सभापती रवी आसवानी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सभापतींवर हात उगारत धक्काबुक्की केली. हा प्रकार खेदजनक आहे. महिला महापौर असल्याने अशा प्रकाराने असुरक्षितता निर्माण झाली आहे. नागरकर यांचे कृत्य सभागृहासाठी अवमानजनक असून कोविड नियमांचे उल्लंघन, मोठय़ा आवाजात घोषणाबाजी, फलक दाखवणे, सभापतीला धक्काबुक्की याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महापौर राखी कंचर्लावार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, सभागृहात सर्वप्रथम बाहेरचे लोक आणून गदारोळाला सुरुवात करणारे मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या विरुद्ध त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही.

अधिकाऱ्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ

महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी अधिकाऱ्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे अधिकारी चांगलेच संतापले आहेत. नगरसेवक कंचर्लावार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उपायुक्त विशाल वाघ यांनी दिली.

नागरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

आमसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर महापौरांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच विनापरवानगी सभागृहात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई, नगरसेवक सचिन भोयर यांनी विनापरवानगी जबरदस्तीने सभागृहात प्रवेश करणाऱ्या नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.