अभिनेता सोनु सूदच्या मागे राजकीय हात असल्याचा संशय शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोनु सूदनं ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटवरून भाजपानं राऊत यांच्यावर टीका केली आहे.

देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर स्थलांतरित मजुरांची स्थिती दयनीय झाली होती. अनेक मजुरांनी पायी घर गाठलं, तर काहींचा रस्त्यातच मृत्यू झाला. या काळात अभिनेता सोनु सूद यानं पुढाकार घेत मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्याच कौतुक होत असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोनू सूद करत असलेल्या कामामागे राजकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर सोनु सूदनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी “अखेर सोनु सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला.. मातोश्रीवर पोहोचले… जय महाराष्ट्र,” असं ट्विट केलं होतं. राऊत यांच्या ट्विटवरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

राऊत यांचं ट्विट रिट्विट करत केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. “काम करा अथवा करू नको पण बंगल्यावर या म्हणजे पावन असाच याचा अर्थ. या संकटातही ‘भेटायला आला नाही’ हा अहंकार संपत नाही,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

राऊत नेमंक काय म्हणाले होते?

“सोनु सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करीत होते. सोनु सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे असं चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनुला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीनं झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनु सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी कोब्रा पोस्टच्या एका स्टिंग ऑपरेशननं सोनु सूदच्या अशाच व्यवहारांचा भांडाफोड केला आहे,” असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं होतं.