08 March 2021

News Flash

देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी: म्हणाले, “शाहू महाराजांचा अनादर करण्याचं मनात सुद्धा येऊ शकत नाही”

रोष वाढू लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन माफी मागितली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो”.

६ मे रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन होता. त्यानिमित्तानं फडणवीस यांनी ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, त्यात झालेल्या चुकीमुळे फडणवीस यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीसांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी – छत्रपती संभाजीराजे भोसले

या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केलं. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला ट्रोल करतोय म्हणून कार्यकर्ते निवेदन सादर करायला जातील”

या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विट करत सावंत यांनी टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 1:24 pm

Web Title: bjp devendra fadanvis apologise over tweet on chhatrapati rajarshi shahu maharaj sgy 87
Next Stories
1 ‘पैसेच संपले आता मुलाला कसं खाऊ घालायचं?’ एका आईचा उद्विग्न सवाल!
2 पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा
3 देवेंद्र फडणवीसांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी – छत्रपती संभाजीराजे भोसले
Just Now!
X