कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतरही लोकांकडून होणारं नियमांचं उल्लंघन आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाउन लावला आहे. राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना लोकल प्रवासबंदी देखील करण्यात आली आहे. एकीकडे राज्य सरकारने करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन गरजेचं आहे सांगितलं असताना विरोधक मात्र यावरुन टीका करत आहेत. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीव्ही ९ शी बोलताना लॉकडाउनवर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रातील रुग्ण आणि मृत्यूदर पाहता जर विचार करुन काही निर्णय घेतला असेल तर आपण त्याचा आदर केला पाहिजे. काही दिवस आपण धीर धरायला हवा. ब्रेक दे चेनसाठी हे गरजेचं आहे,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन अमृता फडणवीस यांनी यावेळी लोकांना केलं.

यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून पुरेशी तयारी झाली नसल्याचंही सांगितलं. “पहिल्या लाटेनंतर येणाऱ्या दुसऱ्या लाटेसाठी पुरेशी तयारी झालेली नाही. आता खूप पाऊलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळे टंचाई कमी होईल अशी आशा आहे. पण आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आलेलं नसून त्यासाठी काम करणं गरजेचं आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

निर्बंध काय?
* बँकांमध्ये १५ टक्के किंवा पाच कर्मचाऱ्यांनाच परवानगी
* आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध. वैद्यकीय कारणासाठी प्रवासास मुभा
* सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बंदी
* शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद. शिक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीस परवानगी
* घरपोच सेवा रात्री ८ नंतरही सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर
* वकिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही. खासगी वाहनाने प्रवास करण्यास मुभा
* बाहेरगावच्या गाड्यांसाठी किंवा विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करण्यास परवानगी
* जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. मात्र, प्रवासाचे योग्य कारण असणे गरजेचे
* लग्न सोहळ्यात उपस्थित हॉलमधील कर्मचारी, कॅटरिंग सेवा पुरविणारे कर्मचारी यांना करोना नसल्याचा अहवाल बंधनकारक

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच मुंबईत प्रवेश
अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबईबाहेरून येणाऱ्या अन्य नागरिकांना शहरात प्रवेश मिळणार नाही. पोलिसांकडून दहिसर, मुलुंड चेक नाक्यावर वाहनांची कठोर तपासणी केली जाणार असून, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य वाहनांना परत पाठविले जाणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार नातलगाचे आजारपण अथवा अंत्यसंस्कारासाठीच दुसऱ्या जिल्ह्याात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या दुसऱ्या जिल्ह्याातील प्रवासावर बंधने घालण्यात आली आहेत. परिणामी मुंबईबाहेरून येणाऱ्यांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त मुंबईत प्रवेश करता येणार नाही.

सरकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासमुभा
केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्र तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण क्षेत्रातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत व खासगी बँका, वित्तीय सेवा किंवा अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वेचा वापर करता येणार नाही. मात्र, त्यांना खासगी वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येईल. रिक्षा-टॅक्सीतून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार नाही.