देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची निव्वळ नाराजी असल्याने माझं तिकीट कापलं गेलं असेल तर इतर पक्षातील जे लोक घेतले त्यांच्यावर कोणताही आक्षेप नव्हता असं आहे का? किंवा आक्षेप असतानाही जाणुनबुजून घेतलं का ? याचं उत्तर हवं. अन्य लोक चालतात मग नाथाभाऊ का चालत नाही? असे अनेक प्रश्न भाजपातील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी विचारले आहेत. मी वरिष्ठांना उपलब्ध माहिती देत त्याआधारे चौकशी करण्याची विनंती केली असून त्याला सुरुवात झाली असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

“पक्षाने मला तिकीट का नाकारलं याबाबतची विचारणा मी पक्षाकडे सातत्याने केली. त्यावेळी तिकीट नाकारण्याचं कोणतंही कारण नाही. आमचा तुमच्यावर कोणताही आक्षेप नाही. पण कोअर ग्रुपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती अशी माहिती देण्यात आली,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

“नाराजी असू शकते पण ती कशाबद्दल होती हेदेखील सांगायला हवं होतं. अशी कोणती मोठी चूक केली होती,” अशी विचारणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपण शिवसेनेच्या संपर्कात होतो असा खुलासाही केला. “मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेते माझ्या संपर्कात होते हे खरं आहे. परंतु चौकशी सुरु झाली असल्याने कारवाई काय होत आहे याची वाट पाहत आहे,” असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

“देवेंद्र फडणवीस तसंच गिरीश महाजन यांच्यासोबत संबंध बिघडले नाहीत, बोलणं सुरु आहे, चर्चा सुरु असतात. पण मनातील खंत व्यक्त केली. मी स्पष्टवक्ता आहे. परिणामांची कधीच चिंता केलेली नाही. जी माहिती मिळाली ती पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घातली असून त्याची नोंद त्यांनी घेतली आहे. हे का केलं याचं उत्तर घेण्याचा मला अधिकार आहे,” असंही यावेळी एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

आणखी वाचा – … म्हणून महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आलं नाही – एकनाथ खडसे

“मी संघर्ष करत राहणार. न्याय मिळत नाही तोपर्यंत मी विचारणा करत राहणार. मी जे सांगितलं त्याची पक्षाने नोंद घेतल्याचं समाधान,” असंही यावेळी ते म्हणाले आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दल बोलताना, “जे पुरावे उपलब्ध आहेत ते पक्षाकडे दिले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यात तथ्य आहे असं अलीकडे लक्षात येत आहे,” असा दावा यावेळी एकनाथ खडसे यांनी केला.