लोकसभेसाठी आघाडीची चाचपणीही सुरू

आसाराम लोमटे, परभणी</strong>

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षानेही आपल्या कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असे सांगितल्याने या वेळची निवडणूक अधिक चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत. निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री डॉ. महेंद्रसिंह यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बुथ पातळीपर्यंतच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादीमार्फत उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या वतीने भाजपच्या विरोधात नेत्यांच्या स्तरावरून दररोजच उलटसुलट विधानाचा सिलसिला चालू झाला असताना लोकसभेसाठी भाजपने आपली स्वतंत्र व्यूहरचना आखली आहे. शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष आहे की विरोधीपक्ष  हे कळणे कठीण झाले असताना भाजपने लोकसभेसाठीही स्वबळाची तयारी चालवली आहे. परभणी लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकावयाचा या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. महेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना केले आहे. जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले तर पारंपरिक मतांचे विभाजन होणार आहे. याचा फटका सर्वात जास्त कोणत्या पक्षाला बसेल हे निकालानंतरच समजणार आहे. भाजपकडून मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर ही नावे लोकसभेसाठी चच्रेत आहेत. शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारीत बदल होईल, असे वाटत नाही. शिवसेनेचा खासदार निवडून आल्यानंतर पक्षद्रोह करतो ही सेनेची आजवरची परंपरा होती, मात्र ही परंपरा खा. जाधव यांनी मोडीत काढली आहे. शिवसेनेत खासदार विरुद्ध आमदार असा संघर्ष असला तरी खासदार जाधव यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत सध्या कोणतेही प्रश्न चर्चिले जात नाहीत.  किंबहूना लोकसभेसाठी पक्ष अन्य कुठल्या नावाचा विचार करील याचीही शक्यता नाही. शिवसेनेत लोकसभेसाठी पक्षांतर्गत स्पर्धा नाही मात्र भाजपमध्ये इच्छुकांची संख्या निवडणूक जवळ येईल तसतशी वाढू शकते.

आघाडीच्या समीकरणात परभणीची जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि ही जागा सातत्याने पक्ष हरतो आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर आजवर सुरेश वरपुडकर, विजय भांबळे हे लोकसभेची निवडणूक हरले आहेत. आता राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी कोणाला दिली जाईल याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे आ. भांबळे यांनी लोकसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचे घोषित केले आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातच त्यांनी आपले लक्ष कंद्रित केले आहे. याचाच अर्थ पक्षाला लोकसभेसाठी नवा चेहरा द्यावा लागणार आहे. जर जुन्या नेत्यांना उमेदवारी द्यायची असे ठरले तर माजी खासदार गणेश दुधगावकर, सुरेश जाधव ही नावे आहेत. तरुण चेहरा द्यायचा असेल तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचा विचार होऊ शकतो.

मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाराष्ट्रात जागा वाटपावरूनही अदलाबदल होऊ शकते. ज्या जागांवर राष्ट्रवादी सातत्याने पराभूत होत आहे अशा जागा काँग्रेसला देण्याबाबत आणि काँग्रेसच्या तडजोडीतील जागा स्वत:कडे घेण्याबाबत सध्या राष्ट्रवादीत विचारमंथन सुरू आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे. अशा वेळी परभणी आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघांत अदलाबदल होऊ शकते. अशीच परिस्थिती राज्यात अन्य काही मतदारसंघांतही आहे. तसे झाले तर काँग्रेसच्या वतीने उमेदवारीसाठी कोण, असाही प्रश्न आहे. मात्र लोकसभा मतदारसंघात परिचित असलेले उमेदवार काँग्रेसकडे फारसे नाहीत. अशा वेळी काँग्रेसचा शोध सुरेश वरपुडकरांच्याच नावावर थांबतो. भविष्यात उमेदवारीच्या अनुषंगाने काय होईल हे सांगणे कठीण असले तरीही आघाडी कायम राहील आणि शिवसेना व भारतीय जनता पक्ष स्वबळावर रिंगणात राहतील असेच संकेत आहेत.

राष्ट्रवादीचे ‘ओबीसी’ कार्ड!

’परभणी लोकसभा मतदारसंघात सातत्याने राष्ट्रवादीच्या वतीने मराठा उमेदवार दिला जातो. उद्या कदाचित शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांचे उमेदवार मराठा राहिले तर राष्ट्रवादीच्या वतीने ‘ओबीसी’ चेहरा दिला जाऊ शकतो. तसे झाले तर हा नवाच प्रयोग पक्षात राहणार आहे. पक्षाने जर ‘ओबीसी’ चेहरा द्यायचे असे ठरवले तर आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा विचार होऊ शकतो.  जिल्ह्य़ात वंजारी समाज मोठय़ा प्रमाणावर आहे.

’जिंतूर व गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघांत वंजारी समाजाची मते निर्णायक आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हे नवे ‘ओबीसी कार्ड’ बाहेर काढू शकते.

’या वेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस आहे. सीताराम घनदाट, रत्नाकर गुट्टे, संतोष मुरकुटे असे मातबर उमेदवार रिंगणात राहतील. अशा वेळी केंद्रे यांना पक्षाने जर लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर ते आनंदाने स्वीकारतील अशी परिस्थिती आहे.