News Flash

विदर्भात भाजपचा गड कायम, सेनेचे यश मर्यादितच

राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही ठिकाणचा अपवाद वगळता फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपने विदर्भात एकहाती विजय मिळविला होता, तोच कल नगरपालिका निवडणुकीतही कायम राहिला आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरुद्ध असंतोष निर्माण होऊनही विरोधी पक्षाला तो मतपेटीत परिवर्तित करण्यात अपयश आल्याचे विदर्भातील नगरपालिका निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम विदर्भातील ३६ नगराध्यक्षांपैकी १८ भाजपला तर पूर्व विदर्भातील अकरा पालिकाध्यक्षांपैकी तब्बल १० जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसला एकूण सहा जागांवर समाधान मानावे लागले. पश्चिम विदर्भात काँग्रेसची गेल्या वेळी तब्बल सोळा नगरपालिकांवर सत्ता होती, आता केवळ पाच ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व उरले. यवतमाळ जिल्ह्य़ात शिवसेनेची मुसंडी, अमरावती जिल्ह्य़ात भाजपच्या वाटय़ाला आलेली भरभरून कमळे, भारिप-बमसंने वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्य़ात दाखवलेली कामगिरी आणि अनेक ठिकाणी एमआयएमने केलेला चंचुप्रवेश लक्षवेधी ठरला आहे. अमरावती जिल्ह्य़ात ‘एमआयएम’चे कोणतेही अस्तित्व नसताना अंजनगाव सुर्जीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेणे हा काँग्रेससाठी इशाराच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवून होता, तेही आता हातातून निघून गेले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही ठिकाणचा अपवाद वगळता फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादा यातून स्पष्ट झाल्या आहेत.

यवतमाळ जिल्हा वगळता शिवसेनेला  चुणूक दाखवता आलेली नाही. अमरावतीत तर एकाच ठिकाणी शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळाले. सत्ताधारी असूनही विरोधी पक्षात असल्यासारखी शिवसेनेची भूमिका आणि संघटनात्मक पातळीवर सैल झालेली पकड त्यासाठी कारणीभूत मानली गेली आहे. पुसदमधून राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक तसेच दर्यापूरमधून अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे विजयी झाल्या. या आमदारद्वयांनी आपल्या सामथ्र्य दाखवून दिले आहे, पण दर्यापूरमध्ये भाजपच्या जागा काँग्रेसपेक्षा कमी आल्या आहेत, हा भाजपसाठी इशाराच आहे. या ठिकाणी एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला एमआयएम आणि भारिप-बमसं आणि स्थानिक आघाडय़ांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ातील पाच आणि वर्धा जिल्ह्य़ातील सहा अशा एकूण ११ पैकी १० नगराध्यक्षपदावर विजय प्राप्त करून  नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला वरचष्मा कायम राखला आहे. एक जागा (राजुरा पालिका) काँग्रेसने जिंकली. चंद्रपूर जिल्ह्य़ात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील मूल पालिकेत पक्षाला निर्विवाद यश मिळवून दिले, तर वर्धा जिल्ह्य़ातील सर्व पालिकाध्यक्षांची निवडणूक जिंकून भाजपने काँग्रेसला धूळ चारली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात काँग्रेस नेते व विधानसभेतील उपनेते विजय वड्डेट्टीवार तर वर्धा जिल्ह्य़ात काँग्रेस आमदार रणजित कांबळे (देवळी), अमर काळे (आर्वी) यांना धक्का बसला आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मूल आणि सिंदेवाही (नगर पंचायत) असा पाच ठिकाणी निवडणुका झाल्या. यापैकी राजुरा वगळता सर्व चारही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले. विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघातील सिंदेवाही नगर पंचायत भाजपनेजिंकली. येथे भाजपला ११, तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या.

वर्धा जिल्ह्य़ातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, पुलगाव आणि सिंदी येथील नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. वर्धात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह प्रभागांमध्येही पक्षाने त्यांचा वरचष्मा कायम राखला. विशेष म्हणजे मुस्लीम वस्त्यांमध्येही ‘कमळ’च चालले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना  पराभव पत्करावा लागला. आर्वी पालिकेत भाजपने नगराध्यक्षासह नगरसेवकपदाच्या सर्व जागा जिंकून तेथील काँग्रेसचे आमदार अमर काळे यांना जबर धक्का दिला आहे.  जिल्ह्य़ात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, मात्र त्यांना त्यांचे गड राखता आले नाही.

मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री तसेच केंद्रीय मंत्री विदर्भातील आहेत. त्यांनी गावागावांत जाऊन कोटय़वधी रुपयांची आश्वासने दिली. ग्रामीण जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडली. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे; परंतु त्यांची अजून सहनशीलता कायम आहे. ती संपल्यानंतर उद्रेक होईल. धनशक्तीच्या जोरावर नगराध्यक्ष थेट निवडण्याचा निर्णय घेतला.

विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:44 am

Web Title: bjp in vidarbha in nagar palika election
Next Stories
1 निवडणूक निकालानंतर विखे-थोरात यांच्यात कलगीतुरा
2 सिंधुदुर्गात राणे-केसरकरांना धक्का
3 रायगडमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट, शिवसेना-भाजपचा शिरकाव
Just Now!
X