पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे. याच आंदोलनजीवी प्रश्नावरुन आज राज्यातील भाजपा आंदोलक आंदोलनजिवी नाही का?, असा प्रश्न पत्रकारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी कोल्हापुरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर यांनी पंतप्रधानांच्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना विमान प्रवासाला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांना आंदोलनजीवी या शब्दावरुन सुरु असणाऱ्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना आंदोलकांचा आंदोलनजिवीअशा शब्दाचा वापर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला आहे सातत्याने आंदोलन करणारा भाजपा आंदोलनजिवी नाही का?, असा प्रश्न या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना दरेकर यांनी, ‘पंतप्रधानांच्या या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. शेतकरी आंदोलनामध्ये पडद्यामागून ते चिघळले जावे असे सूत्र काही प्रवृत्तींकडून चालवले जात आहे. त्यातून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न असून त्यांना उद्देशून मोदी यांनी हे विधान केले होते,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे पुढे बोलताना दरेकर यांनी, शाहीनबाग आंदोलनाच्या काळात ही असाच प्रकार घडला होता, असंही निदर्शनास आणून दिलं.

आणखी वाचा- “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसला एकमेकांच्या निर्णयाची माहिती नसते”; भाजपाचा टोला

त्या आंदोलनाकडे राज्य सरकार बेफिकिरीने पहात आहे

राज्यातील १४ लाख वीज ग्राहकांची वीज तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचा हा जुलमी कारभार असल्याचा टोला लगावला. विकसकांना आणि दारू विक्री (अनुज्ञप्ती परवाना) याबाबत आघाडी सरकार सवलत देण्याची भूमिका घेत आहे. मात्र करोना काळात आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या झालेल्या लोकांना टप्प्याटप्प्याने सवलत देणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिक्षकांचे गेले दहा दिवस आंदोलन सुरू असताना त्याकडे राज्य सरकार बेफिकिरीने पहात आहे. या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत करून प्रश्न मिटवता येणे शक्य आहे, असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- राज्यपालांना विमानातून उतरवल्याने फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले…

…तर पक्ष कारवाई निश्चितपणे करेल

धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेने तक्रार केली असता नीतिमूल्य सांभाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली होती. कोल्हापुरातील भाजपच्या जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांवर महिला अधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. याबाबत भाजप कोणती भूमिका घेणार?, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “या प्रकरणाची वस्तुस्थिती पुढे येणे गरजेचे आहे. संबंधित तक्रार सिद्ध झाल्यास पक्ष कारवाई निश्चितपणे करेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेत असूनही टीका करणारे मुश्रीफ एकमेव मंत्री

विधानपरिषदेच्या १२ सदस्य निवडीबाबत राज्यपालांकडून विलंब होत असल्याने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून टीका होत आहे. याच संदर्भातही दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया दिली. ‘राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांना विधानपरिषद सदस्य राज्यपाल नियुक्त सदस्य निवडताना संविधानिक बाबी तपासून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी काही वेळ देणे गरजेचे आहे. तरीही त्यांच्यावर टीका होणे अनुचित आहे. या मुद्द्यावरून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. सत्तेत राहून सातत्याने टीका करणारे मुश्रीफ हे एकमेव मंत्री आहेत,” असा टोला दरेकांनी लगावला आहे.