काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. दरम्यान, पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी, अंतिम वर्षांच्या परीक्षा यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारला टीकेचा बाण सोडला आहे.

“राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो म्हणाले – हेराफेरी, मजुरांना अन्नपाणी देतो म्हणाले – फिर हेराफेरी, मदतीचे पॅकेज देतो म्हणाले – हेराफेरी पार्ट २, पदवी परिक्षा रद्द करतो म्हणाले…?, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय घेतो म्हणाले…? बाबुभैया? ये क्या चल रहा है?,” असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. “महाविकास आघाडी… बाबुभैया, हेराफेरी तो है! राज्य सरकारची दानत तर दिसत नाही. बाबुभैया, सरकारची नियतही साफ वाटत नाही. एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘हेराफेरी’ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिक्षणाची सरकारला ‘हेराफेरी’ करु द्यायचे नाही,” असेही ते म्हणाले.

आणखी वाचा- मुंबईतील नालेसफाईवर आशिष शेलारांनी उपस्थित केले प्रश्न; म्हणाले, “ही तर हातसफाई”

नालेसफाईवरही प्रश्नचिन्ह

“मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा ‘डोंगर’ उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळे दावे वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ वर्षानुवर्षे सुरू आहे,” असं शेलार यांनी म्हटलं आहे. “मुंबईकर म्हणतात ४० टक्के पेक्षा जास्त सफाई झालेली दिसली नाही. त्यामुळे ११३ टक्केचा दावा २२७ टक्के खोटा आहे. जर नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काट्याची आकडेवारी जाहीर का करीत नाही? सीसीटीव्ही फुटेज का जाहीर करीत नाही? ही नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई,” असं म्हणत शेलार यांनी महापालिकेला प्रश्न विचारले आहेत.