गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवर सत्ताधाऱ्यांकडून देखील टीका केली जात आहे. यामध्ये अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा काही नेत्यांची नावं आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तर ईडीनं लुकआऊट नोटीस देखील काढली आहे. मात्र, अजूनही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावरून खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शेलार म्हणाले, “यंत्रणांचे अधिकारी काम करत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे काय कारण? यंत्रणांच्या कार्यक्षमता विस्तारल्या आहेत, अधिकारी काम करत आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरण तडीला लागत आहेत. राज्यात देशात नियमांच, कायद्याच राज्य सुरु झाल आहे, मात्र असं झालं की राष्ट्रवादीच्या पोटात दुखायला लागतं.”

तर हे यंत्रणांवर दोष देतात

“स्वतच्या पक्षाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची, गैरकारभाराची प्रकरण लपवता येत नसतील तर हे यंत्रणांवर दोष देतात. आईने अभ्यास कर म्हटल्यावर आई चांगल सांगत आहे, हे म्हणण्याऐवजी स्वत:चे अवगुण लपवायला आई जाच करते असं म्हणण्यासारखं हे आहे.”, अशी टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.

पिलावळीला वेसण लागलं म्हणून

शरद पवार यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकारी बँकासंदर्भातल्या धोरणावर काल परखड शब्दांमध्ये टीका केली होती. काही ठराविक बँकाच देशात अस्तित्वात राहतील, अशा पद्धतीचं धोरण रिझर्व्ह बँकेने स्वीकारलं असल्याचं शरद पवार म्हणाले होते. यावर बोलतांना शेलार म्हणाले, सहकार क्षेत्राच्या मजबुतीच काम सुरु आहे. आले माझ्या मना या पद्धतीने सहकारातील संस्था देशोधडीला लावण्याच काम काँग्रेस, राष्ट्रवादीने केल आहे. या नेत्यांना आणि पिलावळीला वेसण लागलं म्हणून अडचण निर्माण होते आहे. स्वैराचार करण्याची मुभा द्या कायद्याच्या चौकटीत बसायच नाही, अशा स्वरुपाच हे विधान असल्याच शेलार म्हणाले म्हणाले.

हेही वाचा – “ईडी कुणाच्या मागे कशी लागेल…”, शरद पवारांची खोचक शब्दांत टीका!

काय म्हणाले होते शरद पवार?

“गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं”, असं शरद पवार म्हणाले होते.

ईडीच्या या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचं शरद पवार म्हणाले. “जिथे गैरव्यवहार झाला असेल, त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचं गृह खातं आहे. इथे तपासाची यंत्रणा असताना ईडीनं त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं आहे. याची अनेक उदाहरणं हल्ली ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असं शरद पवार यांनी नमूद केलं होतं.

हेही वाचा – “…हे धोरण सामान्य माणसासाठी अत्यंत घातक”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!

“सहकारी बँका कमी करणं हेच RBI चं धोरण!”

शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणावर आक्षेप नोंदवले होते. “रिझर्व्ह बँकेचं धोरण हे सामान्य माणसाला अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या नागरी सहकारी बँकांची संख्या कमी करणं, त्या हळूहळू बंद करणं, अन्य बँकांमध्ये विलीन करणं आणि काही ठराविक बँका या देशात राहतील याची काळजी घेणं या सूत्रावर अवलंबून आहे. हे सहकाराच्या दृष्टीने विरोधी आहेच. पण सामान्य माणसाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे”, असं शरद पवार म्हणाले होते.